
Sanjay Raut : ‘मविआ’त सर्वकाही अलबेल; खासदार संजय राऊत
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सल्ल्यानंतर काँग्रेस नेतृत्वाने स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील टीकेवरून नमती भूमिका घेतल्याने महाविकास आघाडीतील वाद शमल्याचे मानले जाते. संसदेतील काँग्रेसच्या कार्यालयामध्ये खासदार संजय राऊत आणि राहुल गांधी यांची भेट झाली. याभेटीदरम्यान विविध मुद्यांवर चर्चा झाल्याचे कळते. राऊत यांनी यानंतर केलेल्या ट्विटमध्ये आघाडीमध्ये ‘ऑल ईज वेल’ असल्याचे सूचक वक्तव्य केले आहे.
राऊत यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘‘श्रीमती सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची आज भेट झाली. अनेक महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. सर्व काही अलबेल आहे. चिंता नसावी.’’ राऊत यांच्या भेटीनंतर राहुल यांनी माध्यमांशी चर्चा करणे टाळले.
मानहानीच्या खटल्यामध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांना शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द झाल्याने केरळमधील वायनाड या लोकसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक लागण्याची शक्यता वर्तविली जात होती.
एकीकडे काँग्रेसविरोधकांनी निवडणुकीसाठी कंबर कसली असतानाच प्रत्यक्ष आयोगाला मात्र याबाबत फारशी घाई नसल्याचे दिसून येते. गुजरात न्यायालयाच्या निकालाला आव्हान देण्यासाठी राहुल यांच्याकडे एक महिन्याचा कालावधी आहे.
तूर्त फेब्रुवारीपर्यंत रिक्त झालेल्या मतदारसंघांबाबतच निर्णय घेण्यात आल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी सांगितले. ते म्हणाले की, ‘‘ सुरतमधील न्यायालयाने राहुल यांना दाद मागण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी दिला असून आम्ही कोणत्याही प्रकारची घाई करणार नाही, न्यायालयाच्या निकालाची वाट पाहू.
न्यायालयाच्या निकालानंतरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल. कायद्यानुसार २३ मार्च रोजीच वायनाड लोकसभेची जागा रिक्त झाल्याची अधिसूचना काढण्यात आली असून या ठिकाणी सहा महिन्यांच्या आत निवडणूक घेणे गरजेचे आहे. संबंधित खासदाराकडे एक वर्षांपेक्षाही कमी कालावधी राहिला असेल तर त्या ठिकाणी निवडणूक घेण्यात येत नाही. वायनाडच्या बाबतीत विचार केला तर राहुल यांच्याकडे वर्षांपेक्षा अधिक काळ असल्याचे दिसून येते.’’