राज्याच्या काही भागांत गुरुवारपासून पावसाची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

पुणे - अर्धा महाराष्ट्र उन्हात होरपळत असताना, येत्या गुरुवारपासून (ता. 5) राज्याच्या काही भागांत तुरळक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे रविवारी व्यक्त करण्यात आला. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान नांदेड येथे 42.5 अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुण्यात कमाल तापमानाचा पारा 38.1 अंश सेल्सिअसपर्यंत वाढला आहे. 

पुणे - अर्धा महाराष्ट्र उन्हात होरपळत असताना, येत्या गुरुवारपासून (ता. 5) राज्याच्या काही भागांत तुरळक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे रविवारी व्यक्त करण्यात आला. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान नांदेड येथे 42.5 अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुण्यात कमाल तापमानाचा पारा 38.1 अंश सेल्सिअसपर्यंत वाढला आहे. 

राज्यात गेल्या काही दिवसांपासून प्रमुख शहरांमधील कमाल तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश शहरांचा त्यात समावेश आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांमुळे राज्यात उष्णतेची तीव्रता वाढली आहे. तापमानात झालेल्या वाढीनंतर राज्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. राज्यात येत्या गुरुवारपासून हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

मध्य प्रदेशात चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून विदर्भ, कर्नाटक, तमिळनाडू आणि कोमोरीन भागांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरावरून बाष्पपुरवठा होत असल्याने पूर्व किनाऱ्यावरील राज्यांमध्ये ढगाळ हवामान आहे. विदर्भातही तुरळक ठिकाणी रविवारी दुपारनंतर आकाश ढगाळ होते. बुधवारी (ता. 4) विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. तर, गुरुवारपासून राज्यात हलक्‍या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात वाढलेली उन्हाचा ताप कायम होता. विदर्भात चंद्रपूर, मध्य महाराष्ट्रात जळगाव, मराठवाड्यात परभणी येथे उच्चांकी तापमान नोंदले गेले. बुधवारपर्यंत (ता. 4 ) पूर्व भारतासह विदर्भात तापमानात वाढ होण्याची शक्‍यता आहे. 

लोहगाव ........ 39.2 
महाबळेश्‍वर ..... 33 
मालेगाव .......... 41.2 
सोलापूर ........... 41 
औरंगाबाद ........ 39.2 
परभणी ............. 40.9 
नांदेड .............. 42.5 
अकोला ........... 41.7 
अमरावती ......... 40.7 
ब्रह्मपुरी ........... 40.8 
चंद्रपूर .............. 42 
गोंदिया ............... 40.4 
नागपूर ............... 41.4 
वर्धा .................. 41.5 
यवतमाळ ........... 41 
(स्त्रोत ः भारतीय हवामान खाते, सर्व आकडे अंश सेल्सिअसमध्ये) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: possibility of rainfall in maharshtra