एक 'डोळस' गोष्ट! 

Ganpat maharaj jagtap
Ganpat maharaj jagtap

नियतीसमोर हात न टेकता केवळ आपल्या जिद्दीच्या जोरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत त्यांनी नावलौकिक मिळवला. गणपत महाराज जगताप हे दृष्टिहीन आहेत. मात्र चिकाटीच्या जोरावर डोळस व्यक्तीलाही लाजवेल इतके त्यांचे कार्य-कर्तृत्व चांगले आहे. त्यांच्या कार्याविषयी... 

आळंदीतील ज्ञानेश्‍वर महाराजांच्या समाधिस्थळाशेजारी असणाऱ्या अजानबाग वृक्ष आहे. या वृक्षाखाली भिंतीच्या कडेला चौकोनाकार रांगेत ज्ञानेश्‍वरीचे पारायण करत अनेक वारकरी बसले होते. अजानबाग वृक्षाच्या अगदी शेजारी बसून गणपत महाराज जगतापही या वारकऱ्यांसारखेच ज्ञानेश्‍वरीच्या पारायणात तल्लीन झाले होते. मात्र त्यांच्या या पारायण सोहळ्यात फरक एवढाच होता, की इतर वारकऱ्यांच्या समोर ज्ञानेश्‍वरी ग्रंथ पुस्तक स्वरुपात उपलब्ध होता आणि जगताप महाराज मात्र हात जोडून कोणत्याही ग्रंथरूपी पुस्तकाशिवाय मुखोद्‌गत असलेली ज्ञानेश्‍वरी म्हणत होते. 
तेथे जाऊन हळूच आवाज देताच ते अत्यंत सहजपणे उठले. भिंतीच्या आधाराने पायऱ्या उतरून खाली आले. खाली येताच, "जय हरी माउली...' म्हणत नाव, गाव, अशी आस्थेने चौकशी केली. पुढे त्यांच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पांत त्यांनी त्यांचा जीवनपटच उलगडला... 

जालना जिल्ह्यातील घेटूळी या दुर्गम खेडेगावातील शेतकरी कुटुंबात गणपत महाराजांचा जन्म झाला. त्यांच्या आई-वडिलांना तीन अपत्ये; गणपत महाराज त्यापैकी एक! इतर सर्वसामान्य मुलांसारखेच त्याचेही बालपण वयाच्या पाचव्या वर्षांपर्यंत सुखकर होते. गावात अचानक आलेल्या देवीच्या रोगाला गणपत महाराज बळी पडले आणि सगळेच विस्कटले. अपुरे उपचार, दुर्लक्ष याचा परिणाम गणपत महाराजांच्या दृष्टीवर झाला, अन त्यांना कायम स्वरूपाचे अंधत्व आले. हसत्या खेळत्या वयात गणपत महाराजांवर हा फार मोठा आघात होता. शारीरिक अपंगत्वाबरोबरच त्यांचे मानसिक खच्चीकरणही मोठ्या प्रमाणावर होऊ लागले. घरची परिस्थिती फार बेताची असल्यामुळे घरच्यांनीही त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरवात केली. यामुळे त्यांची हेळसांड होऊ लागली. हीन दर्जाची वागणूक समाजातील लोकांकडून मिळू लागली. इच्छा असूनही शाळेत जाता येईना, शिक्षण घेता येईना. केवळ श्रवणशक्तीच्या जोरावर वर्गात एका कडेला बसून शिकतानादेखील ते वर्गात चुटकीसरशी उत्तरे देत. इतर डोळस मुले आणि त्यांच्या पालकांना हे पाहवत नव्हते. "शाळा शिकून काय करणार आहे, हे आंधळं? उगा शिकणाऱ्या पोरांचं वाटुळं करतंय...' असे म्हणत गावातील लोक त्यांना शाळेतून हुसकावू लागले. त्यामुळे श्रवणशक्तीच्या माध्यमातून होता नव्हता तो शिक्षणाचा मार्गदेखील बंद झाला. पुढची दोन - तीन वर्षे अशीच हलाखीत गेल्यानंतर गावातून आषाढी वारीला निघालेल्या लोकांच्या मदतीने ते पंढरपूर येथे आले. येथे येऊन त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात बसून हरिपाठ, भजन, कीर्तन यांचे श्रवण करण्यास सुरवात केली. 

पंढरपूर येथील वास्तव्याच्या काळात त्यांना आळंदी येथे कीर्तन, प्रवचनाचे आध्यात्मिक शिक्षण देणारी संस्था आळंदीत आहे. अशी माहिती मिळाली अन्‌ त्यांनी आपला मुक्काम आळंदीला हलविला. आळंदीला आल्यानंतर अत्यंत निराधार, निराश्रितपणे ते राहू लागले. दररोज माधुकरी मागायची, त्यातूनच जगायचे. उरलेल्या वेळात पूर्णपणे श्रवणभक्ती करायची. त्यांनी आपल्या अचाट श्रवणशक्तीच्या जोरावर अनेक अभंग, हरिपाठ, ज्ञानेश्‍वरी, चांगदेव पासष्टी, भगवद्‌गीता, रामायण, महाभारत, यासारखे अनेक ग्रंथ मुखोद्‌गत केले. याबरोबरच मृदंग, तबला, पेटी यासारखी वाद्येही ते वाजवायला शिकले. श्रवण मार्गातून त्यांनी हे ज्ञान केवळ आत्मसात केले नाही, तर त्यावर प्रभुत्वही मिळवले. या मिळवलेल्या ज्ञानातून ते ज्ञानार्जन करू लागले. कीर्तन, भजन, पारायणाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर समाज जागृतीचे काम त्यांनी सुरू केले. हे समाज जागृतीचे काम करत असताना त्यांच्या लक्षात आले, की दृष्टिहीन व्यक्तींसाठी ब्रेल लिपीत ज्ञानेश्‍वरी, तुकाराम गाथा हे ग्रंथ उपलब्ध नाहीत. या व्यक्तींना ज्ञानेश्‍वरी उपलब्ध व्हावी, यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. विविध सामाजिक संस्था, संघटना यांबरोबरच ज्या ठिकाणी ते कीर्तनासाठी जात त्यांच्याकडे त्यांनी दृष्टिहीन व्यक्तींसाठी ब्रेल लिपीतून ज्ञानेश्‍वरी, भगवद्‌गीता या ग्रंथाच्या निर्मितीसाठी मदत करण्याची संकल्पना सांगण्यास सुरवात केली. या सर्व ठिकाणांहून त्यांना कोणत्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. याउलट "अशा प्रकारची ग्रंथनिर्मिती करण्यासाठी गाडीभर कागद लागतील, त्याला येणारा खर्च अफाट असेल,' असे संस्थानी सुनावले. मात्र जगताप महाराज शांत बसले नाहीत. संतांचे साहित्य ब्रेल लिपीतून येण्यासाठी त्यांची धडपड सुरू असतानाच 1980-81 च्या दरम्यान पुणे आकाशवाणीवर भाषण करण्याची संधी त्यांना मिळाली. या भाषणातून त्यांनी लोकांना आवाहन केले, की लोकांनी माझे कीर्तन, प्रवचनाचे कार्यक्रम गावोगावी ठेवावेत. याप्रकारचे कार्यक्रम करून त्यातून मिळणाऱ्या मानधनातून मी ब्रेल लिपीतून ज्ञानेश्‍वरीचे काम पूर्ण करू शकेन. आकाशवाणीच्या माध्यमातून त्यांचे म्हणणे हजारो लोकांपर्यंत पोचले. या कार्यक्रमानंतर पुण्यातील गजानन केळकर यांच्याकडून त्यांना ब्रेल लिपीतील ग्रंथाच्या निर्मितीसाठी पहिला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या गृहस्थांनी पत्रात असे सांगितले, की पुण्यातील नरसिंह मंदिरात मी तुम्हाला जागा मिळवून देईन. याठिकाणी तुम्ही कीर्तन, प्रवचनाचे कार्यक्रम करू शकता. केळकरांनी जगताप महाराजांना मदत केल्यामुळे ब्रेल लिपीतील ग्रंथनिर्मितीची संकल्पना प्रत्यक्षात उतरण्यास सुरवात झाली. यासाठी केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांतून त्यांना पाच-दहा रुपये मिळू लागले. ही रक्‍कम फार मोठी नव्हती, पण केलेल्या संकल्पाच्या दिशेने वाटचाल करण्यास प्रोत्साहन देणारी होती. ब्रेल लिपीतील ग्रंथ निर्मितीसाठी केलेला हा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक लोकांनी मदत केली. त्यातील एक म्हणजे सदाशिव घाटे! या गृहस्थांनी एक दिवशी रस्ता ओलांडण्यास त्यांना मदत करताना वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या ब्रेल लिपीतील संकल्पनेविषयी वाचल्याचे सांगितले. मदत म्हणून ब्रेल लिपीतील ग्रंथनिर्मितीच्या पहिल्या प्रतीसाठी मदत करण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले. ब्रेललिपीतील ग्रंथाच्या एका प्रतीची निर्मिती करण्यासाठी 3000 रुपये खर्च येत होता. त्यासाठी घाटे यांनी त्याकाळी 1500 रुपयांची सर्वांत मोठी मदत जगताप महाराजांना केली. पुढे 1984-85 च्या सुमारास ब्रेल लिपीतील ग्रंथाच्या दोन प्रतींची निर्मिती झाली. त्या प्रतीचे प्रकाशन तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्रात पहिल्यांदा ब्रेल लिपीत ग्रंथाची निर्मिती करण्याचे श्रेय गणपत महाराज यांना जाते. 

ब्रेल लिपीतील ग्रंथाच्या प्रचार व प्रसाराचे कार्य 
ब्रेल लिपीतील पहिल्या ग्रंथाचे काम पूर्ण करून ही गणपत महाराज थांबले नाहीत. तर त्यांनी हे काम अनेक दृष्टिहीन लोकांपर्यंत पोचवण्याचे काम सुरू केले. याबरोबर आळंदी या ठिकाणी दृष्टिहीन लोकांसाठी संस्था सुरू केली. पुढे त्यांनी ज्ञानेश्‍वरीबरोबरच चांगदेव पासष्टी, अमृतानुभव गुरुचरित्र, तुकारामांची अभंग गाथा, रामदास स्वामींचे श्‍लोक यासारख्या अनेक ग्रंथांची निर्मिती ब्रेल लिपीत केली आहे. या ग्रंथ साहित्याच्या निर्मितीबरोबरच त्यांनी आपले अर्धवट राहिलेले शिक्षण घेण्यास सुरवात केली. केवळ आपल्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी वयाच्या बेचाळिसाव्या वर्षी समाजशास्त्र या विषयात टिळक महाविद्यालयातून त्यांनी बी.ए.ची पदवी पूर्ण केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (त्या काळचे पुणे विद्यापीठ) त्यांनी वयाच्या अठ्ठेचाळिसाव्या वर्षी मध्ययुगीन वाङ्‌मयाचा इतिहास या विषयात एम. ए. पूर्ण केले. वयाची सत्तरी पार केलेल्या गणपत महाराजांचा उत्साह अजूनही वाखणण्याजोगा आहे. ज्ञानेश्‍वरीतील पर्यावरण या विषयात पीएच. डी. करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रभर कीर्तन, प्रवचन, पारायणे करत असतात. 
गप्पा संपवून जगताप महाराज पाठमोरे होऊन पुन्हा आपल्या पारायणासाठी गेले. तरी त्यांची पाठमोरी आकृती मात्र डोळ्यासमोरून जात नव्हती. निसर्गाने लादलेल्या परिस्थितीशी झुंजायचेच म्हटले, तर त्यावर तुम्ही मात करून वर्चस्वही गाजवू शकता, हे मला पुन्हा पुन्हा त्यांच्या उदाहरणातून जाणवत होते. 

नुकत्याच होऊन गेलेल्या हिवाळी अधिवेशनात मंजूर झालेल्या दिव्यांग व्यक्तींसाठी मंजूर झालेल्या विधेयकाबद्दलदेखील बोलताना ते म्हणतात, "वारसा हक्काने मिळणाऱ्या संपत्तीमध्ये दृष्टिहीन लोकांची जवळच्या नातलगांकडूनच मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे. अशा प्रकारची फसवणूक थांबवण्यासाठी सरकारने यासाठी कडक कायदे केले पाहिजेत.' यासाठी त्यांनी पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहारदेखील केला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com