esakal | तिसऱ्या आघाडीचा चौथा कोन!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhandge Gore Deshmukh

जनता पक्ष फुटला आणि तिसऱ्या आघाडीची ताकद हळूहळू कमी झाली. पुढे रामजन्मभूमी प्रकरण, शिवसेनेबरोबर हातमिळवणी यामुळे महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढत गेली आणि उजव्या शक्‍तींची लाट येण्याची चिन्हे दिसू लागली.

तिसऱ्या आघाडीचा चौथा कोन!

sakal_logo
By
प्रकाश अकोलकर

जनता पक्ष फुटला आणि तिसऱ्या आघाडीची ताकद हळूहळू कमी झाली. पुढे रामजन्मभूमी प्रकरण, शिवसेनेबरोबर हातमिळवणी यामुळे महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढत गेली आणि उजव्या शक्‍तींची लाट येण्याची चिन्हे दिसू लागली. हीच लाट तिसऱ्या शक्‍तीचा राजकीय अवकाश व्यापत गेली. 

काँग्रेस आणि जनसंघ - पुढे भारतीय जनता पक्ष या दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांना चार हात दूर ठेवून राजकारणाला नवं नेपथ्य देण्याची मनीषा बाळगणाऱ्या पक्षांना १९९०च्या दशकापासून ‘तिसरी शक्‍ती’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. महाराष्ट्रापुरता विचार करावयाचा झाल्यास या ‘शक्‍ती’मध्ये कम्युनिस्टांचे दोन्ही गट, समाजवादी पक्षाच्या विविध शाखा आणि शेतकरी कामगार पक्ष यांचा समावेश दिसतो. खरं तर कम्युनिस्टांचे कॉ. श्रीपाद अमृत डांगे, मिरजकर, बी. टी. रणदिवे, ए. बी. वर्धन आदी अनेक नेते महाराष्ट्रातीलच आणि समाजवादी पक्षाचे दिग्गज साथी एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, जॉर्ज फर्नांडिस, मृणाल गोरे हेही महाराष्ट्रीयच आणि शेकापची तर स्थापनाच महाराष्ट्रात झालेली, तरीही आज या तिसऱ्या शक्‍तीचं महाराष्ट्रात नामोनिशाण उरलेलं नाही.

समाजवादी वा डाव्या विचारांच्या शक्‍तींचा शाहू-फुले-आंबेडकरांच्या आणि स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्रात हा ऱ्हास कधी आणि कसा झाला, त्याचीच ही कहाणी आहे. 

संयुक्‍त महाराष्ट्रासाठी झालेल्या उग्र आंदोलनानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र या मराठी भाषिकांच्या स्वतंत्र राज्याची स्थापना झाली. त्या आंदोलनात खरं तर हेच तिन्ही पक्ष म्हणजेच तिसरी शक्‍तीच ‘संयुक्‍त महाराष्ट्र समिती’ अशा व्यासपीठावरून नेतृत्व करत होती. मात्र, त्या आंदोलनाला यश मिळताच, समितीत फूट पडली आणि एकीचं बळ संपुष्टात आलं. त्यानंतर झालेल्या पहिल्या, १९६२ च्या विधानसभा निवडणुकीत या तीन गटांपैकी फक्‍त शेकापला १५ जागा जिंकून ‘डबल फिगर’ गाठता आली होती. प्रजासमाजवादी पक्षाला नऊ जागा मिळाल्या होत्या, तर कम्युनिस्टांच्या वाट्याला त्या निवडणुकीत अवघ्या सहा जागा आल्या होत्या. एक जागा संयुक्‍त समाजवादी म्हणजे ‘संसोपा’नं जिंकली होती. दरम्यान, कम्युनिस्ट पक्षाचे चीन युद्धानंतर दोन तुकडे झाले, तरीही पाच वर्षांनंतर १९६७ मध्ये झालेल्या निवडणुकीत उजव्या कम्युनिस्टांनीही दहा जागा जिंकल्या, तर मार्क्‍सवाद्यांनाही तीन जागा मिळाल्या होत्या. शेकापने १९ जागा जिंकून आपली ताकद वाढवली आणि समाजवाद्यांच्या दोन्ही फळ्यांच्या वाट्याला मिळून १२ जागा आल्या होत्या. 

त्यानंतर बांगलादेश विजयानंतर उफाळलेल्या इंदिरा गांधींच्या लाटेत या तिसऱ्या शक्‍तीचं बळ कमी झालं आणि कोणालाच दुहेरी संख्या गाठता आली नाही. पुढे आणीबाणीनंतर समाजवाद्यांचे दोन्ही गट हे जनता पक्षात विलीन झाले. त्यांच्यासोबत जनसंघही जनता पक्षात होता. जयप्रकाश नारायण यांचा करिष्मा आणि विलिनीकरणामुळे साहजिकच टाळली गेलेली मतविभागणी यामुळे १९७८च्या विधानसभा निवडणुकीत जनता पक्षानं दणदणीत ९९ जागा जिंकल्या होत्या. त्यातल्या मोठा वाटा हा पूर्वाश्रमीच्या जनसंघीयांचा असला, तरी समाजवादी विचारसरणीला महाराष्ट्रात मिळालेलं हे सर्वांत मोठं यश होतं.

पुढे जनता पक्षही फुटला आणि या गटांची ताकद हळूहळू कमी होत गेली. शरद पवारांनी १९८५ मध्ये ‘पुलोद’चा प्रयोग केला, तेव्हा जनता पक्षाला (म्हणजेच त्यात उरलेल्या समाजवाद्यांना) वीस आणि त्याच प्रयोगात सहभागी असलेल्या शेकापला तेरा जागा मिळाल्या होत्या. मात्र, त्यानंतर रामजन्मभूमी मुक्‍ती आंदोलन, अयोध्येतील ‘बाबरीकांड’ आदी कारणांमुळे भाजपची ताकद वाढत गेली. शिवाय, शिवसेनेशी केलेली हातमिळवणीही भाजपच्या पथ्यावर पडली आणि महाराष्ट्रात उजव्या शक्‍तींची लाट येण्याची चिन्हे दिसू लागली. हीच उजवी लाट मग याच अस्तंगत होऊ पाहत असलेल्या तिसऱ्या शक्‍तीचा राजकीय अवकाश हळूहळू व्यापत गेली. समाजवादी, तसेच डाव्या विचारांना साथ देणारे मृणाल गोरे यांच्या गोरेगावसारखे बालेकिल्लेही ढासळू लागले. शिवाय, शेकापमध्येही कोकणातला एक आणि देशावरचा एक असे, पक्षांतर्गतच का होईना दोन गट निर्माण झाले आणि त्यांपैकी कोकणातल्या गटाने सत्तापदांसाठी कधी काँग्रेस, तर कधी भाजप-शिवसेना यांच्याशी हातमिळवणी करणं सुरू केलं. दि. बा. पाटलांसारखा शेकापचा नेताही मग शिवसेनेच्या दारात जाऊन उभा राहू लागला. मात्र, पश्‍चिम महाराष्ट्रात एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख, मराठवाड्यात कंधारचे केशवराव धोंडगे आदींच्या रूपानं शेकाप आपलं सत्त्व थोडंफार टिकवून आहे. 

समाजवाद्यांच्याच पुढाकारानं उभ्या राहिलेल्या जनता दलाला खरं तर १९९९ मध्ये शिवसेना-भाजपच्या लाटेत अकरा जागा मिळाल्या होत्या. मात्र, १९९९ मध्ये त्यांना अवघ्या दोन जागा जिंकता आल्या आणि २००४, २००९, तसंच २०१४ अशा तीन निवडणुकांमध्ये एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. तीच गत उजव्या कम्युनिस्टांचीही झाली. तिसऱ्या शक्‍तीच्या पतनास अनेक कारणं असली, तरी त्याचं इंगित त्या त्या पक्षांत सतत होणाऱ्या फाटाफुटीतच प्रामुख्यानं आहे. शरद पवार यांचा आधार घेत या तिसऱ्या शक्‍तीनं काही काळ बळ दाखवलं. मात्र, आता ही तिसरी शक्‍ती पुनःश्‍च एकवार चौथ्या कोनाच्या शोधात आपलं अस्तित्वच गमावू पाहत आहे. 
 (क्रमशः)

loading image
go to top