Loksabha 2019 : 'प्रवीण गायकवाड यांना काँग्रेसने धोका दिला' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 एप्रिल 2019

अकोल्यातून डॉ. अभय पाटील यांना कॉंग्रेसने उमेदवारी देण्याचे आश्‍वासन दिले. परंतु, ऐनवेळी त्यांचा पत्ता कट केला. पुण्यातही प्रवीण गायकवाड यांच्या रूपाने त्याचीच प्रचिती आली. वंचित बहुजन आघाडीने गायकवाड यांना ऑफर दिल्याचे कॉंग्रेस नेत्यांना समजताच त्यांनी गायकवाड यांना उमेदवारी देण्याचे आश्‍वासन दिले.

सोलापूर : पुणे लोकसभा मतदारसंघातून प्रवीण गायकवाड यांना वंचित बहुजन आघाडीने ऑफर दिली होती. परंतु, कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची त्यांना खात्री होती. मात्र, शेवटी कॉंग्रेसने गायकवाड यांना धोका दिला. दरम्यान, गायकवाड निवडणूक लढविणार असतील, तर आपण त्याठिकाणी उमेदवारच देणार नव्हतो, असा गौप्यस्फोट ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज सोलापुरात केला. 

अकोल्यातून डॉ. अभय पाटील यांना कॉंग्रेसने उमेदवारी देण्याचे आश्‍वासन दिले. परंतु, ऐनवेळी त्यांचा पत्ता कट केला. पुण्यातही प्रवीण गायकवाड यांच्या रूपाने त्याचीच प्रचिती आली. वंचित बहुजन आघाडीने गायकवाड यांना ऑफर दिल्याचे कॉंग्रेस नेत्यांना समजताच त्यांनी गायकवाड यांना उमेदवारी देण्याचे आश्‍वासन दिले. वंचित बहुजन आघाडीचा अंदाज घेऊन कॉंग्रेसने गायकवाड यांची ऐनवेळी उमेदवारी कापल्याचा आरोपही ऍड. आंबेडकर यांनी या वेळी केला.

दरम्यान, प्रवीण गायकवाड यांना उमेदवारी देण्यावरून श्रीमंत कोकाटे यांनाही बोललो होतो. परंतु, गायकवाड यांना निश्‍चिपणे कॉंग्रेस उमेदवारी देईल, असा विश्‍वास सर्वांनाच होता. त्या वेळी मी त्यांना म्हणालो की, हा कॉंग्रेस पक्ष आहे. उमेदवारी मिळते का, याची खात्री करा. शेवटी माझे वक्‍तव्य खरे ठरल्याचेही ऍड. आंबेडकर यांनी सांगितले. 

Web Title: Prakash Ambedkar targets Congress on Pravin Gaikwad issue