esakal | ‘प्रेरणा’ने दिला राज्यातील बळिराजाला आधार
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer

‘प्रेरणा’ने दिला राज्यातील बळिराजाला आधार

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यांमध्ये ‘प्रेरणा प्रकल्पा’च्या माध्यमातून आतापर्यंत तीन वर्षांत सुमारे ९० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे समुपदेशन करून त्यांना नैराश्‍यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत असलेल्या १०४ क्रमांकाच्या हेल्पलाइनवर आतापर्यंत सुमारे २६ हजार कॉल्स आले आहेत.

मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी आणि विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ आणि वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये २०१५ पासून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत नैराश्‍यग्रस्त शेतकऱ्यांना समुपदेशन करून त्यांना त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो.

मानसोपचार तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविला जात आहे. प्रेरणा प्रकल्पाच्या माध्यमातून समुपदेशन कक्षाचे विस्तारीकरण तसेच आशा वर्कर्स यांना मानसिक आजारासंदर्भात प्रशिक्षण दिले जाते. गेल्या तीन वर्षांत सुमारे दोन हजार वैद्यकीय अधिकारी, दहा हजार निमआरोग्य कर्मचारी आणि २० हजार आशा वर्कर्स यांना मानसिक आजाराबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे.

मानसिक आराेग्याबद्दल प्रशिक्षण
डिसेंबर २०१८ अखेर वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि आशाताई अशा १२ हजार ७०० जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमध्ये २० हजार ९१३ आशाताई कार्यरत आहेत. त्यांना तालुकास्तरावर मानसिक आरोग्य व त्या अनुषंगिक आजाराबद्दल प्रशिक्षण देण्यात आले आहे.

loading image