कांद्याला प्रतिकिलो १० पैसे ते २० रुपयांचा भाव! बळिराजाच्या डोळ्यात अश्रू; सोलापूर बाजार समितीत दररोज १३५ गाड्यांची आवक

कांद्याला सध्या प्रतिकिलो १० पैसे ते जास्तीत जास्त आठ ते दहा रुपयांचा दर मिळत आहे. सोलापूर बाजार समितीत दररोज कांद्याची आवक सरासरी १३० गाड्यांची आहे. उत्पन्नाचा खर्चही निघत नाही, पण नाशवंत कांदा ठेवून काय करायचा, या विचाराने शेतकरी बाजारात येत आहे.
they got rich with onion
they got rich with onionsakal
Updated on

सोलापूर : कांद्याला सध्या प्रतिकिलो १० पैसे ते जास्तीत जास्त आठ ते दहा रुपयांचा दर मिळत आहे. सोलापूर बाजार समितीत दररोज कांद्याची आवक सरासरी १३० गाड्यांची आहे. उत्पन्नाचा खर्चही निघत नाही, पण नाशवंत कांदा ठेवून काय करायचा, या विचाराने शेतकरी बाजारात येत आहे. सोलापूर, धाराशिव, पुणे, बीड या जिल्ह्यांसह कर्नाटक हद्दीतून कांदा विक्रीसाठी येथे येत आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्यासाठी आता राज्यभर प्रसिद्ध झाली आहे. पण, गतवर्षी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड झाल्याने फेब्रुवारीनंतर कांद्याचे दर खूपच कमी झाले. त्यात अजूनही सुधारणा झालेली नाही. सध्या शेतकऱ्यांना १० पैसे किलो (किमान दर १०० रुपये) दराने देखील कांदा विकावा लागतोय.

बहुतेक शेतकऱ्यांच्या कांद्याला प्रतिकिलो सात ते दहा रुपयांचाच दर मिळत आहे. अगदी पाच ते सहा क्विंटल कांद्याला दोन हजार ते चोवीसशे रुपयांचा दर मिळतोय. मंगळवारी (ता. ११) सोलापूर बाजार समितीत १७४ गाड्यांची आवक होती. त्या कांद्याला किमान प्रतिक्विंटल १०० रुपये आणि सरासरी नऊशे ते अकराशे रुपयांचा दर मिळाला. कांदा लागवडीपासून ते कांदा बाजार समितीत विक्री होईपर्यंतचा खर्च देखील निघत नसल्याची खंत शेतकरी बोलून दाखवीत आहेत.

बाहेर महागाई, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळेना

मागणीच्या तुलनेत आवक नसल्याने सध्या किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर १५० ते १८० रुपये किलो आहे. मात्र, शेतकऱ्यांना ९० ते १०० रुपये किलोचाच दर मिळतोय. दुसरीकडे कांदा, वांगी, मिरची, भाजीपाल्याचे दर घसरल्याची स्थिती आहे. ग्राहकांसाठी बाजारात महागाई, पण शेतकऱ्यांच्या नशिबी निराशाच आहे. सोलापूर बाजार समितीत भाजीपाल्यासह इतर शेतमालांची आवक आहे, पण बळिराजाला अपेक्षित दर मिळत नसल्याचे चित्र आहे.

भाववाढीच्या आशेने यंदा पुन्हा वाढणार लागवड

सोलापूर जिल्ह्यात कांद्याची लागवड खरिपाच्या उत्तरार्धात जास्त प्रमाणात होते. आता शेतकऱ्यांनी दीड हजार ते सतराशे रुपये किलो दराने कांदा बियाणे घेतले आहेत. रोपे टाकण्यासाठी आता शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. मागच्या वर्षी अपेक्षित भाव मिळाला नाही, यंदा तरी मिळेल म्हणून कांदा लागवड वाढेल, अशी शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. जिल्ह्यात जवळपास ५० हजार हेक्टरवर कांदा लागवडीचा अंदाज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.