बॅंक कर्मचाऱ्यांनाही पन्नास लाखांचे विमा कवच द्या 

प्रमोद बोडके
Sunday, 5 July 2020

म्हणून वाढला कर्मचाऱ्यांवर ताण 
केंद्र सरकारने सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना तातडीचे कर्ज करून उपलब्ध करून देण्याची योजना व शेतकऱ्यांना देण्यात येत असलेले पीक कर्ज यामुळे बॅंकेतून गर्दी वाढतच आहे. यामुळे कर्मचारी शाखेत उपस्थित राहण्यास भीत आहेत. कोरोनाच्या दहशती मध्ये काम करत असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे. 

सोलापूर : बॅंकेच्या प्रत्येक शाखेचे ठराविक काळाने निर्जंतुकीकरण करावे, प्रत्येक शाखेतील गर्दी नियंत्रणासाठी सुरक्षारक्षक नेमा, शाखेतील अंतर्गत बैठक व्यवस्था व अंतर्गत व्यवस्था गरजेप्रमाणे बदला, कोरोना झाल्यास ती शाखा त्वरित बंद करून निर्जंतुकीकरण करावे व उर्वरित कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सल्ल्याने होम क्वारंटाईन करावे, 55 वर्षे वरील, महिला व विशेषतः गर्भवती महिला कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची सुविधा द्यावी, शक्‍यतो पन्नास टक्के कर्मचाऱ्यांना आळीपाळीने कामावर बोलवावे, सर्वच बॅंक कर्मचाऱ्यांना 50 लाखांचे विमा कवच उपलब्ध करून द्यावे अशा मागण्या बॅंक ऑफ महाराष्ट्रमधील युनायटेड फोरम ऑफ महाबॅंक युनियन्सने केली आहे. 

ऑल इंडिया बॅंक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन, बॅंक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स ऑर्गनायझेशन, बॅंक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशन, बॅंक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी सेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्व संघटनांचा या फोरममध्ये समावेश आहे. कोरोनाच्या महामारीच्या संकटातून उद्‌भवलेल्या स्थितीतून बॅंक कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठीचा हा प्रयत्न केला असल्याचे फोरमने या निवेदनात म्हटले आहे. कोरोनाची स्थिती सुधारण्यासाठी वेळ लागणार असून परिस्थिती आणखीन गंभीर वळण घेऊ शकते. त्यामुळे व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना कृतिशील धीर देण्याची गरज आहे.

या मागण्यांचे निवेदन पुण्यातील बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या कार्यकारी संचालकांना सोमवारी (ता. 6) सायंकाळी 5 वाजता देण्यात येणार आहे. यावेळी विविध संघटनांच्या प्रत्येकी दोन प्रतिनिधींना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती कर्मचारी संघटनेचे नेते संतोष चित्त्याळकर यांनी दिली. बॅंकेच्या प्रत्येक झोनल ऑफिसमध्ये कोरोनाची परिस्थिती व नियोजन यासाठी विशेष अधिकारी नेमावा. या अधिकाऱ्याचा नंबर सर्व कर्मचाऱ्यांना द्यावा या देखील मागण्या करण्यात आल्या आहेत बॅंकिंग सेवा अत्यावश्‍यक आहेत पण बॅंक कर्मचारीही अत्यावश्‍यक समजून त्यांना व्यवस्थापनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यास या कोरोना योध्यांचे मनोबल वाढेल असा विश्‍वास अधिकारी संघटनेचे नेते श्रीशैल मेहकर यांनी व्यक्त केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: provide insurance cover of Rs 50 lakh to bank employees