esakal | 'आईच्या संस्काराची शिदोरी राजकारणातही कामी आली' 
sakal

बोलून बातमी शोधा

'आईच्या संस्काराची शिदोरी राजकारणातही कामी आली' 

'आईच्या संस्काराची शिदोरी राजकारणातही कामी आली' 

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आईने केलेल्या संस्काराची शिदोरीच गेल्या 50 वर्षांतील राजकारणात उपयुक्‍त ठरली, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेल्या पत्रकार संदीप काळे संपादित "मु. पो. आई' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. 30 दिग्गज संपादकांनी त्यांच्या आईविषयी केलेले लेखन या पुस्तकात आहे. "ग्रंथाली प्रकाशन'ने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची प्रस्तावना पवार यांनी लिहिली आहे. 

ज्येष्ठ पत्रकार, खासदार कुमार केतकर, "सकाळ माध्यम समूहा'चे संचालक श्रीराम पवार, अभिनंदन थोरात यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व माध्यमांचे संपादक-संचालक या वेळी उपस्थित होते. "आई शारदाबाई यांनी आम्हा सात भावंडे व चार बहिणींचा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सांभाळ केला. शेतीबरोबरच राजकारणातही त्या सक्रिय होत्या' असे सांगत पवार यांनी त्यांच्यासंदर्भातील अनेक आठवणी जागवल्या. जन्म देताना आईचे रूप वेगळे असते; पण मुलांचा सांभाळ करताना तिच्यातील मातेचे रूप त्याहून वेगळे असते, असे ते म्हणाले. माझी आई 1937 मध्ये लोकल बोर्डाची सदस्या होती. एकाही बैठकीला ती गैरहजर राहत नसे. उशीर झाल्यास मानधन घेत नसत. राजकारणातील ही शिस्तच मला राजकीय वाटचालीत उपयोगी पडली, असेही पवार यांनी नमूद केले. 

...तर अराजकता नाहीशी होईल! 
आई-मुलाच्या नात्यावर जगभरात संशोधन सुरू आहे. ते आव्हानात्मकच आहे. आईच्या प्रत्येक मूल्याची जोपासना प्रत्येकाने केल्यास जगभरात दिसणारी अराजकता नाहीशी होईल, असे मत केतकर यांनी व्यक्त केले. 

loading image
go to top