esakal | शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीपूर्वीच इच्छुकांचा सोशल मिडीयाद्वारे प्रचार 
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीपूर्वीच इच्छुकांचा सोशल मिडीयाद्वारे प्रचार 

मीच कसा योग्य उमेदवार 
पुढील काही महिन्यात होणाऱ्या शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीचा प्रचार उमेदवारांनी सुरु केला आहे. शिक्षक आमदारकीसाठी आपणच कसे योग्य उमेदवार आहोत हे पटवून देण्याचा प्रयत्न इच्छुक उमेदवारांकडून सुरु झाला आहे. त्यासाठी या उमेदवारांनी सोशल मिडियाचा उपयोग करुन घेण्यास सुरवात केली आहे. शिक्षकांच्या व्हॉटस्‌ऍपवर आतापासूनच या उमेदवारांकडून मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. या सोशल मिडियाच्या प्रचाराला मतदार असणारे शिक्षक किती बळी पडतात हे येणारा काळच ठरवणार आहे. 

शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीपूर्वीच इच्छुकांचा सोशल मिडीयाद्वारे प्रचार 

sakal_logo
By
संतोष सिरसट

सोलापूर ः केंद्रीय निवडणुक आयोगाने बिहारच्या निवडणुका जाहीर केल्यापासून राज्यातील वेगवेगळ्या संस्थांच्या होणाऱ्या निवडणुकीची चर्चा सुरु झाली आहे. त्याला शिक्षक आमदारकी ही अपवाद नाही. राज्य निवडणूक आयोगाने अद्याप या निवडणुकीसाठी काही निर्णय घेतला नाही. मात्र, आगामी निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन इच्छुकांनी हालचाली सुरु केल्या आहेत. या निवडणुकीसाठी आपल्यालाच निवडून देण्याचे आवाहन शिक्षकांच्या गळी उतरविण्यासाठी सोशल मिडियाच्या माध्यमातून इच्छुक उमेदवारांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचारासाठी "सोशल वॉर' सुरु केले आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच सोशल मिडीयाच्या माध्यमातून निवडणुकीचा "फिल' तयार झाला आहे. 

पुणे विभागातील विधानपरिषदेच्या सर्वसाधारण गटातील शिक्षक आमदारकीची मुदत नुकतीच संपली आहे. त्यामुळे आता नवीन आमदारकीचे वेध बऱ्याच जणांना लागले आहे. इच्छुकांनी आपण कसे दावेदार आहोत हे सिद्ध करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर सुरू केला आहे. त्यात फेसबुक, व्हॉट्‌सऍप, शाळांचे ग्रुप, शिक्षकांचे ग्रुप, मुख्याध्यापकांच्या ग्रुपचा वापर सुरू केला आहे. कोरोना संसर्गामुळे या निवडणूक कधी होणार या बाबत साशंकता होती. परंतु बिहार राज्याचा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे याही निवडणुका लवकरच होतील, अशी खात्री झाल्याने बऱ्याच जणांनी आमदारकीच्या बाशिंगाची तयारी सोशल मीडियावर सुरू केली आहे. विविध ग्रुपचा वापर करत शिक्षक कार्यकर्ते आपलाच नेता श्रेष्ठ कसा हे पटवून देत आहेत. पुणे विभागातून महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समितीचे अपक्ष उमेदवार माजी आमदार दत्तात्रय सावंत हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. शिक्षक परिषदेकडून सोलापूरचे जितेंद्र पवार हे आमदारकीसाठी प्रयत्न करीत आहेत. पुण्याच्या रेखा पाटील या ही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्या राज्याचे शिक्षण संचालक दिनकर पाटील यांच्या पत्नी आहेत. त्याचबरोबर प्रहार संघटनेचे संस्थापक सचिन नागटिळक हे स्वतःचा प्रचार करीत आहेत. कोल्हापूर येथून कायम विनाअनुदानित समितीचे खंडेराव जगदाळे हे ही कामाच्या माध्यमातून निवडणुकीचा प्रचार करीत आहे. यंदाच्या निवडणुकीत जुनी पेन्शन योजना, अतिरिक्त शिक्षक, विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाचा प्रश्‍न, शिक्षकांना देण्यात आलेली अशैक्षणिक कामे या मुद्यांवर प्रत्येक उमेदवार एकमेकांचे कर्तृत्व सोशल मेडियाद्वारे शिक्षकापर्यंत शेअर करत आहेत. राज्यातील विविध राजकीय पक्ष हे पक्षाचे लेबल असलेले उमेदवार देणार का शिक्षक संघटनांचे लेबल पुढे करत स्वतःचे उमेदवार रिंगणात उभे करणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. एकंदरीत निवडणुका कार्यक्रम जाहीर होण्याच्या अगोदरच सोशल मीडियावर शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीच्या प्रचाराची रंगत पाहायला मिळत आहे.