esakal | सोलापूरच्या औषध प्रशासनाची पुण्याचे सहआयुक्त करणार चौकशी 
sakal

बोलून बातमी शोधा

arun unhale

सोलापूर डिस्ट्रिक्‍ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्यावतीने सोलापूरच्या औषध प्रशासनाबाबत केलेल्या गंभीर आरोपाची चौकशी केली जाईल. यासाठी सहआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. या चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. 
- अरुण उन्हाळे, आयुक्त अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य 

सोलापूरच्या औषध प्रशासनाची पुण्याचे सहआयुक्त करणार चौकशी 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर डिस्ट्रिक्‍ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्यावतीने सोलापूर जिल्ह्याच्या औषध प्रशासनावर केलेल्या गंभीर आरोपाची दखल राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने घेतली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अरुण उन्हाळे यांनी या आरोपांची चौकशी करण्यासाठी पुण्याच्या औषध प्रशासनाचे सहआयुक्त सुरेश पाटील यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. येत्या एक ते दोन दिवसात चौकशी अधिकारी सुरेश पाटील सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. 

संघटनेच्यावतीने करण्यात आलेले आरोप, औषध प्रशासनाची भूमिका जाणून घेऊन ते याबाबतचा सविस्तर अहवाल अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अरुण उन्हाळे यांना सादर करणार आहेत. औषध प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील औषध दुकानांची तपासणी करून औषध विक्रेत्यांना किरकोळ चुकांसाठी अवाढव्य रकमेची मागणी करणे, रकमेची पूर्तता न केल्यास औषध विक्री दुकानांचा परवानाच रद्द केले जातात असा गंभीर आरोप असोसिएशनच्यावतीने करण्यात आला आहे. औषध प्रशासनाच्या कारभाराबाबतच्या असोसिएशनच्या सभासदांनी (औषध विक्रेत्यांनी) आमच्याकडे तक्रारी केल्या असल्याचे असोशियनने म्हटले आहे. 

कोरोना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता अत्यावश्‍यक सेवा म्हणून जिल्ह्यातील सर्व केमिस्ट बांधव सेवा देत आहेत. अशा स्थितीत औषध प्रशासनाकडून औषध विक्रेत्यांना कोणतेही मार्गदर्शन केले जात नाही. शासनाकडून आलेले परिपत्रक पाठवणे एवढेच काम या अधिकाऱ्यांनी केले असल्याचा आरोप असोसिएशनच्यावतीने करण्यात आला आहे. औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांची आर्थिक संपत्ती त्यांच्या उत्पन्नाच्या तुलनेत अधिक आहे. याबाबतची माहिती अधिकारी दडवत असल्याचा आरोप असोसिएशनने केला असून त्यांच्या मालमत्तेची व उत्पन्नाची चौकशी व्हावी अशी मागणीही असोसिएशनचे अध्यक्ष बसवराज मणुरे व सचिव राजशेखर बारोळे यांनी केला आहे.