"संभाजी ब्रिगेड'मध्ये फूट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

पुणे - मराठा सेवा संघाच्या "संभाजी ब्रिगेड'मध्ये फूट पडली असून, राजकीय पक्ष म्हणून ब्रिगेडसोबत काम करण्यास नकार दिलेल्या मंडळींनी स्वतंत्र ब्रिगेड स्थापन केली आहे. प्रवीण गायकवाड यांची या नव्या गटाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. दरम्यान, या गटाने त्यांच्या संघटनेला "संभाजी ब्रिगेड' हे नाव वापरू नये, असा इशारा विद्यमान अध्यक्ष मनोज आखरे यांनी दिला आहे.

पुणे - मराठा सेवा संघाच्या "संभाजी ब्रिगेड'मध्ये फूट पडली असून, राजकीय पक्ष म्हणून ब्रिगेडसोबत काम करण्यास नकार दिलेल्या मंडळींनी स्वतंत्र ब्रिगेड स्थापन केली आहे. प्रवीण गायकवाड यांची या नव्या गटाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. दरम्यान, या गटाने त्यांच्या संघटनेला "संभाजी ब्रिगेड' हे नाव वापरू नये, असा इशारा विद्यमान अध्यक्ष मनोज आखरे यांनी दिला आहे.

प्रवीण गायकवाड, शांताराम कुंजीर यांच्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा आखरे गटाने दिला आहे. दुसरीकडे गायकवाड यांच्या गटाने तेच संघटनेच्या अध्यक्षपदी असल्याचा दावा करत आज आपण पदाची सूत्रे स्वीकारत असल्याचे जाहीर केले. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली "संभाजी ब्रिगेड'ची स्थापना झाली होती. तिचे पहिले अध्यक्ष म्हणून गायकवाड यांची नियुक्ती झाली होती. धर्मादाय आयुक्तांकडे तशी नोंद करण्यात आली होती. त्यानंतर गायकवाड यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. त्यांनी "संभाजी ब्रिगेड'च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी मनोज आखरे यांची नियुक्ती झाली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून गायकवाड यांनी पुन्हा ब्रिगेडमध्ये सक्रिय व्हावे, यासाठी सोशल मीडियात मोहीम चालविण्यात आली होती. त्यावरून दोन्ही गटांत वादही झडत होते. त्याची परिणती आज अखेर फुटीत झाली.

गायकवाड यांचा दावा
'संभाजी ब्रिगेडचा राजकीय पक्ष काढल्याने कार्यकर्त्यांची ससेहोलपट झाली. काही व्यक्तींच्या हट्टामुळे ते सर्व झाले. यापुढे सामाजिक संघटना म्हणून ब्रिगेड कार्यरत राहील, असे गायकवाड यांनी सांगितले. प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून सुधीर भोसले, हिंदूराव हुजरेपाटील, महासचिवपदी सुभाष बोरकर आणि मुख्य समन्वयकपदी शांताराम कुंजीर यांच्या नावाची या वेळी घोषणा करण्यात आली. धर्मादाय आयुक्तांकडे केलेल्या नोंदणीत अध्यक्ष म्हणून अजून माझेच नाव असल्याचा दावा गायकवाड यांनी केला, त्यामुळे संघटनेचे नाव वापरण्याचा हक्क असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आखरेंची टीका
गायकवाड यांच्या या दाव्याला आखरे यांनी हरकत घेतली. 'शेकापमध्ये काही चालेनासे झाल्याने गायकवाड यांनी रडीचा डाव खेळला आहे. त्यांना "संभाजी ब्रिगेड' हे नाव वापरण्याचा हक्क नाही. कार्यकर्त्यांत संभ्रम पसरविण्यासाठी त्यांचा हा प्रकार सुरू आहे. खेडेकर आणि ब्रिगेडमधील कार्यकर्त्यांचा त्यांनी विश्‍वासघात केला आहे. राजकीय पक्ष म्हणून "संभाजी ब्रिगेड'ची आगेकूच सुरू आहे. या प्रगतीमुळे अनेकांच्या पोटात दुखते आहे,'' असा टोला त्यांनी लगावला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune maharashtra news sambhaji brigade divide