मराठा आरक्षणासाठी पुणे-मुंबई लॉंगमार्च : संभाजीराजे यांचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sambhajiraje
मराठा आरक्षणासाठी पुणे-मुंबई लॉंगमार्च ः संभाजीराजे

मराठा आरक्षणासाठी पुणे-मुंबई लॉंगमार्च : संभाजीराजे यांचा इशारा

पिंपरी : ‘‘मराठा आरक्षणाबाबत केंद्र व राज्य सरकारची जबाबदारी वेगवेगळी आहे. सद्यःस्थितीत राज्य सरकारने मागासवर्गीय आयोग स्थापन करावा, तसे करता न आल्यास समिती नियुक्त करून सर्वेक्षण करावे. पण, काहीच होत नसेल तर, पुणे ते मुंबई लॉंगमार्च काढू,’’ असा इशारा खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी मंगळवारी दिला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे पिंपरीतील महात्मा फुले पुतळा परिसरात फुले सृष्टी आणि संभाजीनगर येथील राजर्षी शाहू महाराज पुतळा परिसरात शाहू सृष्टी उभारली जाणार आहे. त्या कामांचे भूमीपूजन संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘‘सामाजिक मागास सिद्ध करण्याची सर्वेक्षण ही पहिली पायरी आहे.

हेही वाचा: लसीकरणात शेगाव तालुका नंबर वन

आरक्षणाबाबत केंद्र सरकारची जबाबदारी आणि राज्य सरकारची जबाबदारी काय?, हे यापूर्वी त्या-त्या सरकारांना मी सांगितले आहे. हा विषय लगेच होणारा नाही. त्याला सहा महिने लागू शकतील. वर्ष लागू शकेल. पण, राज्य सरकारने मागासवर्गीय आयोग किंवा समिती स्थापन करून सर्वेक्षण करायला हवे. पण, राज्य सरकार काहीच करत नसेल, तर केंद्र सरकारकडे जाऊ शकतो. आज हा केंद्राचा विषय नाही. त्यामुळे पुन्हा महाराष्ट्र पिंजून काढतो आहे. राज्य सरकारने तरी कोणताही निर्णय न घेतल्यास पुण्याहून मुंबईपर्यंत लॉंगमार्च असेल.’’
मी कोणत्याही पक्षाचा नाही. राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. मुदत संपायला अद्याप सहा महिने बाकी आहेत. त्यानंतर माझी भूमिका स्पष्ट करेन, असे स्पष्ट करून संभाजीराजे म्हणाले की, एसटी कामगार व प्रवाशांना राज्य सरकारने वेठीस धरू नये. कामगारांना काय देता येईल, याचा विचार करावा. मुख्यमंत्र्यांनी कामगारांना बोलवून ताबडतोब निर्णय घ्यावा व दिलासा द्यावा.

loading image
go to top