esakal | पुणे विद्यापीठाच्या आरोग्य क्षेत्रातील कक्षा रुंदवणार; आरोग्य विज्ञान विद्यापीठसोबत सामंजस्य करार

बोलून बातमी शोधा

null
पुणे विद्यापीठाच्या आरोग्य क्षेत्रातील कक्षा रुंदवणार; आरोग्य विज्ञान विद्यापीठसोबत सामंजस्य करार
sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे : सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्रातील माहितीची, ज्ञानाची आणि अभ्यासाची अधिकाधिक देवाण-घेवाण होऊन त्यात भरीव काम व्हावे यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून आरोग्य क्षेत्रातील अभ्यासाच्या संधी वाढविण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठ यांच्यात याबाबत सामंजस्य करार झाला आहे. करारानुसार दोन्ही विद्यापीठांमधील प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांना ज्ञानाची, अभ्यासाची देवाण घेवाण करणे शक्य होणार आहे. करारावर स्वाक्षऱ्या करताना पुणे विद्यापीठ आणि विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन.एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, नवोपक्रम व नवसंशोधन व साहचर्य विभागाच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, आरोग्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. आरती नगरकर, आरोग्य विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. के.डी. चव्हाण, अधिष्ठाता डॉ. सचिन मुंबरे, डॉ. श्रीकांत देशमुख आदी उपस्थित होते.

हेही वाचा: 'सीरम'पाठोपाठ 'भारत बायोटेक'नेही कमी केली कोरोना लशीची किंमत

करारानुसार दोन्ही विद्यापीठांमधील प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी यांच्यामध्ये अध्ययन, शिबिरे, कार्यशाळा, परिषदा व अन्य अभ्यासविषयीच्या कार्यक्रमांचे आदान-प्रदान करण्यात येईल. तसेच एकत्रितरित्या संशोधन, ग्रंथालय उपयोग करता येणार आहे.

‘‘सध्याच्या काळात आरोग्य क्षेत्रात एकमेकांच्या सहकार्याने काम करण्याची खूप गरज आहे. यातूनच नवे मार्ग मिळू शकतील. अशा कराराच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात योगदान देण्याचा दोन्ही विद्यापीठांचा प्रयत्न आहे.’’

- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ