
विरोधी वृत्ती संपवूयात!
कोल्हापूर : ‘‘ज्या वृत्ती विरोधात राजर्षी छत्रपती शाहू महाराज लढले, ती वृत्ती आजही जिथे-जिथे जिवंत असेल तर ती संपविण्याची प्रतिज्ञा आज आपण करुया आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांना अपेक्षित असलेले राज्य आपण घडवूया,’’असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे केले.
शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त येथील छत्रपती शाहू मिलमधील कार्यक्रमात आयोजित सभेत त्यांनी ऑनलाइन संवाद साधला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापुरुषांच्या स्मारकासाठी निधी देण्यात महाविकास आघाडी सरकार कोठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही दिली. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, माजी खासदार संभाजीराजे यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यातील ऋणानुबंधाना उजाळा दिला. ते म्हणाले, ‘‘ शाहू महाराज युगपुरुष होते. त्यांनी लोककल्याणकारी राज्य कारभार केला. त्यांनी समाजाला दिशा दिली. जगावे कसे आणि कोणासाठी, हे कृतीतून दाखवून दिले.’’
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की राजर्षी शाहू महाराज यांचे विचार शंभर वर्षांनंतरही महाराष्ट्राने जपले आहेत. कोल्हापूरवासियांनी राजर्षी शाहूंचा विचार खऱ्या अर्थाने जागविला आहे. शाहू मिलमधील शाहू महाराज स्मारकाला लागेल तेवढा निधी दिला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
राज्यात जातीयवादाचा प्रयत्न
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, ‘‘मानवतावाद आणि समतावाद दोन्हीकडे विशेष लक्ष देऊन यापुढे आपल्याला पावले टाकायची आहेत. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात जातीयवाद निर्माण करण्याचा मोठा प्रयत्न सुरू आहे. अशा प्रयत्नांना आपण सर्वांनी हाणून पाडण्याची गरज आहे. मला खात्री आहे की समतेचा विचार संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतात पुन्हा एकदा पोहचेल आणि त्यासाठी राजर्षी शाहू महाराजांचे विचार महत्त्वाचे ठरतील.’’
Web Title: Put End Hostile Attitudes Chhatrapati Shahu Maharaj Centenary Year Chief Minister Uddhav Thackeray
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..