सत्यजीत तांबेंना विखेंकडून विशेष ऑफर; थोरातांना काढला चिमटा! : Vikhe on Satyajeet Tambe | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Radhakrishna Vikhe Patil offer Satyajeet Tambe Joining Bjp

Vikhe on Satyajeet Tambe: सत्यजीत तांबेंना विखेंकडून विशेष ऑफर; थोरातांना काढला चिमटा!

मुंबई : विधानपरिषदेसाठी नाशिक पदवीधर मतदार संघातून अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे हेच निवडून येतील असा विश्वास भाजप नेते राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केला आहे. तांबेंना त्यांनी भाजपच प्रवेश करण्याची विशेष ऑफरही दिली आहे. त्याचबरोबर तांबेंचे मामा असलेल्या बाळासाहेब थोरातांना राजकीय चिमटा काढला आहे. (Radhakrishn Vikhe offer to Satyajeet Tambe for entering in BJP)

राधाकृष्ण विखे म्हणाले, मामानं काय करावं तो मामाचा प्रश्न आहे, त्यानं आता पक्षालाही मामा बनवलं आहे. त्यामुळं मला वाटतं की त्यांची काय भूमिका असेल ती व्यक्तीगत आहे. त्यामुळं सत्यजीतचा विजय निश्चित आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करायला हवा. कारण बहुतांश ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सत्यजीत तांबेंसाठी काम केलं आहे. त्यांनाच मतदान व्हावं यासाठीही भाजप कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. त्यामुळं नैतिकता म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचा आदर सत्यजीत ठेवतील असा मला विश्वास आहे.

दरम्यान, नाशिक मतदारसंघात सत्यजीत तांबे, शुभांगी पाटील यांच्यात प्रमुख लढत होत आहे. दोघेही अपक्ष उमेदवार आहेत. पण तांबेंना भाजपसह इतर पक्षांनी पाठिंबा दिला आहे. तर शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीनं पाठींबा दर्शवला आहे. त्यामुळं भलेही हे दोघेही उमेदवार अपक्ष असले तरी त्यांच्यामध्ये मोठी चुरस पहायला मिळणार आहे. या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं.

सत्यजीत तांबेंनी विधानपरिषदेसाठी पक्ष शिस्तीचा भंग केल्यानं त्यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलं आहे. पक्षानं अधिकृत एबी फॉर्म दिलेला नसतानाही त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. काँग्रेसनं या जागेसाठी सत्यजीत तांबे यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांना एबी फॉर्म देत अधिकृत उमेदवारी दिली होती. पण सुधीर तांबे यांनी देखील मुलासाठी आपला अर्ज दाखल न केल्यानं काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढवली होती. त्यामुळं पक्षानं त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई केली आहे.