
विक्रमगड तालुक्यातील वाकी येथे जागेच्या हद्दीवरून झालेल्या मारहाणीत रघुनाथ पांडुरंग जाधव (50) रक्तबंबाळ झाले होते. परंतु पोलीस स्टेशनमध्ये (Police Station) न्याय मिळण्याऐवजी पोलीसांनी त्याला व त्याच्या कुटुंबीयांना अटक करून दमदाटी केल्यानं भीतीपोटी रघुनाथ जाधव यांनी विष प्राशन करून आत्महत्या (suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार घडून आला आहे. या घटनेनं तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात विक्रमगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस व जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनेवरून मोखाडा पोलीस प्रभारी अधिकारी चौकशी करीत आहेत. रघुनाथ जाधव यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेले विक्रमगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदिप गिते व हवालदार रघुनाथ गावित यांना निलंबित करून त्यांच्यावरदेखील गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी कातकरी आदिम संघटना, महाराष्ट्र व आदिवासी एकता मित्र मंडळ या संघटनांकडून जिल्हा पोलीस अधीक्षक यांना 11 फेब्रुवारी रोजी निवेदन देण्यात आले आहे.
वाकी या गावात राहणारा रघुनाथ पांडुरंग जाधव यांचा 31 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या दरम्यान घराच्या कुंपणाच्या वादावरून शेजारी राहणाऱ्या गावित कुटुंबीयांबरोबर वाद झाला होता. या वादात रघुनाथ जाधव यांना बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये जखमी झाल्याने त्यांनी विक्रमगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलीसांनी दोन्ही पक्षकारांना 1 फेब्रुवारीला पोलीस ठाण्यात बोलावून घटनेची माहिती घेतली. त्यानंतर रघुनाथ जाधव यांच्याविरूद्ध चाप्टर केस नोंदवण्यात आली. 2 फेब्रुवारीला रघुनाथ जाधव व त्यांच्या कुटुंबीयांविरू्ध्द प्रत्यारोप करणारी तक्रार नोंदवल्याने पोलीसांकडून जाधव कुटुंबीयांना अटक करण्यात आली. रघुनाथ जाधव व कुटूंबीयांची जव्हार न्यायालयाकडून जामिनावर सुटका झाली.
रघुनाथ जाधव यांना मारहाण केली या बद्दल आपल्यावर अन्याय झाला असताना पोलीसांनी रास्त बाजू समजून घेण्याऐवजी आपल्यालाच दमदाटी व शिवीगाळ केल्याने व गावित कुटुंबीयांच्या भांडणाला कंटाळून मनात भीती धरून निराश झालेल्या रघुनाथ जाधव यांनी 5 फेब्रुवारी रोजी विषप्राशन केले. त्यांना उलटी झाल्यानंतर ही बाब उघडकीस आल्याने त्याला प्रथम मलवाडा व नंतर विक्रमगड, जव्हार व नाशिक येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र गंभीर प्रकृती असणाऱ्या रघुनाथ जाधव यांचा 6 फेब्रुवारी रोजी रात्री 8.30 च्या सुमारास रूग्णालयात मृत्यू झाला.
मारहाणी दरम्यान दात पाडून रक्त वाहत असताना आपल्या तक्रारीकडे कानाडोळा केल्याचे रघुनाथ जाधव यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केल्याचे दिसून येत आहे. आपल्याला न्याय देण्याऐवजी विक्रमगड पोलीस अधिकाऱ्यांनी शिवीगाळ करत अपमानास्पद वागणूक दिल्याचे या चिठ्ठीतील आशयावरू निदर्शनास येत आहे.
या संदर्भात आत्महत्येस प्रवृत केल्या प्रकरणी (भा.द.संहिता कलम 306 अंतर्गत) विक्रमगड पोलीस ठाण्यात रोशन गावित, योगेश गावित, पंढरी गावित, विमल गावित, यांच्या विरूद्ध तक्रार नोंदवली असून त्याचा तपास मोखाडा येथील पोलीस प्रभारी अधिकारी करीत असल्याचे सुत्रांकडून माहिती मिळाली.
मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठीच्या ( सुसाईड नोट) हस्ताक्षरांची पडताळणी होणार आहे. या सुसाईड नोट मधील विक्रमगड पोलीस निरीक्षक (PI) प्रदिप गिते व गावित कुटुंबीयांते नातेवाईक रघुनाथ गावित यांच्यावरही निलंबनाची कारवाई करून यांच्यावर गुन्हा दाखल करावा, यासाठी कातकरी आदिम संघटना , महाराष्ट्र, आणि आदिवासी एकता मित्र मंडळ यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे. कारवाई न झाल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उग्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.