esakal | Vidhan Sabha 2019 : कसे आहात, अच्छे दिन आले का? राहुल गांधींचा प्रश्न
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi addresses public meeting in Latur Maharashtra

कसे आहात... तुमचा मुड कसा आहे... बेरोजगारी आहे का... युवकांना रोजगार मिळाला का... शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली का... मग अच्छे दिन आले का... असे प्रश्न विचारत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाषणाला सुरवात केली.

Vidhan Sabha 2019 : कसे आहात, अच्छे दिन आले का? राहुल गांधींचा प्रश्न

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूर : कसे आहात... तुमचा मुड कसा आहे... बेरोजगारी आहे का... युवकांना रोजगार मिळाला का... शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली का... मग अच्छे दिन आले का... असे प्रश्न विचारत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाषणाला सुरवात केली. महाराष्ट्रातील रक्तात, ह्रदयात काँग्रेस भिनली आहे. ती कोणाला बाजूला करता येणार नाही. त्यामुळे या निवडणूकीत काँग्रेस पक्षच जिंकणार, असा मला विश्वास आहे, असेही ते म्हणाले.

विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील पहिली सभा लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघात राहुल गांधी यांनी घेतली. या वेळी तरुणाईची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. माजी केंद्रिय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर, प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मल्लीकार्जून खर्गे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, अमित देशमुख, बसवराज पाटील-मुरूमकर, राजीव सातव, मधुकरराव चव्हाण आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

मोदींनी देशाला बरबाद केले, असे शेतकरी, सर्वसामान्य लोक, युवक म्हणत आहेत. पण मिडियात याबाबत एक शब्दही बोलला जात नाही. बेरोजगारी वाढली, कर्जमाफी केली नाही. हेही मिडियातून सांगितले जात नाही. जनतेचे मुद्दे उचलले जात नाहीत, असा आरोप करून राहुल म्हणाले, एकामागून एक कारखाने बंद होत आहेत. एटोमोबाईल क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. कपडा उद्योग-हिऱ्यांचा उद्योग बंद पडला. हे काय चालले आहे, समजून घ्या. सत्ताधारी कधी काश्मिरच्या मुद्यावर तर कधी 370च्या मुद्यावर बोलतात. पण जनतेच्या मुद्यावर बोलत नाहीत. मोदीजी, शहा यांचे खऱ्या मुद्यावरील काम बाजूला सारले जाते. मीडिया केवळ त्यांचे गुणगाण गात आहे.

जेवढे देशाला वेगळे कराल तेवढा देश मागे सरकेल. देशाला एक ठेवणे हीच देशाची खरी शक्ती आहे, असेही राहुल यांनी सांगितले.

पुढचा मुख्यमंत्री आमचाच
आमचे सरकार आले तर शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफी देणार. फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना फसवले. आम्ही फसवणार नाही. सध्याच्या सरकारने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. त्यामुळे महाराष्ट्र आता आपल्या हातातून जाऊ देऊ नका, असे चव्हाण यांनी सांगितले. थोरात म्हणाले, हे फडणवीस सरकार नाही; फसवणूक सरकार आहे. विमा मिळाला नाही. शेतकऱ्यांना कर्ममुक्त केले नाही. बेरोजगारी वाढवली. कारखाने बंद केले. त्यामुळे कुठलाच घटक समाधानी नाही. या सरकारला जनता नाकारेल. त्यामुळे पुढचा मुख्यमंत्री आमचाच राहिल.