esakal | आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार
sakal

बोलून बातमी शोधा

rahul gandhi

आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. त्याला काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांनी मंगळवारी (ता.२०) हिरवा कंदील दाखविला आहे. त्यानुसार नाना पटोले यांनी औरंगाबादसह, मुंबई, नागपूरमध्ये रॅली काढणार असल्याचे जाहीर केले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी मंगळवारी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी काळात होणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढविण्यासाठी राहुल गांधी यांनी संमती दिल्याचे जाहीर केले. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेची निवडणूक काँग्रेस आता स्वबळावर लढणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

औरंगाबाद महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याचा कार्यकर्त्यांचा सूर आहे. त्यानुसार संपर्कमंत्री तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी तयारी करण्याचा सूचना पदाधिकाऱ्यांना वारंवार केलेली आहे. महापालिकेची २०१५ मध्ये झालेली निवडणूक काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करून लढविली होती. त्यात काँग्रेसला १० तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला पाच जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची वाताहत झाली होती. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसने स्थानिक नेतृत्वात बदल करत माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची तर शहराध्यक्षपदी हिशाम उस्मानी यांची निवड केली. त्यानुसार गेल्या वर्षभरापासून शहरासह जिल्ह्यात पक्षबांधणीचे काम सुरू आहे.

हेही वाचा: Marathwada Corona Update: मराठवाड्यात ३४० कोरोना रुग्णांची वाढ

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत प्रदेशाध्यक्षांनी भूमिका जाहीर केली आहे. पक्ष नेतृत्वाच्या आदेशानुसार स्वबळाची आमची तयारी आहे. प्रत्येक पदाधिकारी त्यानुसार आगामी काळात कामाची रूपरेषा ठरवेल. यापूर्वी अनेक निवडणुका आम्ही स्वबळावर लढविल्या आहेत.
-डॉ. कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष

महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी आम्ही तयारी केली आहे. शहरात काँग्रेसला मोठा प्रतिसाद मिळत आहे. वर्षभरात तब्बल पाचशे ते सहाशे जणांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यात डॉक्टर, वकील, अभियंते, समाजात प्रतिष्ठा असलेल्या नागरिकांचा समावेश आहे.
-हिशाम उस्मानी, शहराध्यक्ष

loading image