तळीयेत दरडीखाली 47 जण बेपत्ता; शोधकार्यात अडथळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळीयेत दरडीखाली 47 जण बेपत्ता; शोधकार्यात अडथळे

तळीयेत दरडीखाली 47 जण बेपत्ता; शोधकार्यात अडथळे

अलिबाग : कोकणावर कडेलोट करणाऱ्या बेफाम पावसाने विश्रांती घेतल्याने ठिकठिकाणी मदत आणि बचाव कार्याला वेग आला आहे. पावसाच्या रौद्र रूपामुळे अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले असून आज दुर्घटनास्थळी मृतांच्या नातेवाइकांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश ऐकायला मिळाला. आतापर्यंत महाडमधील तळीये मधलीवाडी या गावातील 49 जणांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे; अद्याप 47 जणांचा ढिगाऱ्याखाली शोध सुरू असून ते जिवंत असण्याची शक्यता कमी असल्याने प्रशासनाच्या नातेवाइकांचा संताप उफाळून आला. प्रशासनाने वेळेत मतदकार्य पोहचवले असते तर अनेकांचे जीव वाचले असते, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

गावात शनिवारी शोधकार्य सुरू झाल्यानंतर दिवसभरात नऊ मृतदेह शोधण्यात आले. सायंकाळी सहानंतर बचावकार्य थांबवण्यात आल्याची माहिती महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिली. दरडग्रस्तांचे नातेवाईक मुंबई, पुणे, सुरत येथून चौकशी करत असून प्रशासनातर्फे त्यांना पुरेशी माहिती दिली जात नाही, असा आरोप होत असल्याने त्यांच्यासाठी संपर्क कक्ष सुरू केला आहे. महसूलचे अधिकारी मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांची माहिती, त्यांच्याशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न करीत आहेत. मृतांवर त्याच ठिकाणी अंत्यसंस्कार केले जात आहेत, मृतांचे पंचनामे करण्याचे सोपस्कार रात्री उशिरा संपल्याची माहिती अपर जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी दिली. त्यानंतर मृतांचा अधिकृत आकडा जाहीर करणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली

एकूण २५० लोकवस्तीच्या तळीये गावात ३५ घरे आहेत. गावात कोंढाळकर, धुमाळ, पोळ, शिरावळे, पांडे, मालुसरे अशी कुटुंबे राहत होती. डोंगराच्या अगदी कडेला असलेल्या या गावातील बहुतांश लोक नोकरी-धंद्यासाठी मुंबई, पुणे, सुरत या शहरांमध्ये गेले आहेत. गावात फक्त वयोवृद्ध व लहान मुले राहतात. गुरुवारी (ता.२२) ही घटना घडली तेव्हा गावात साधारण ८० लोक होते. यातील पाच जण वाचले आहेत. बाकी ग्रामस्थांवर निसर्गाने झडप घेतली आहे.

बचावकार्य थांबले

संपूर्ण डोंगर गावावर कोसळल्याने गावात आठ ते दहा फूट दगड-गोटे- माती वाहून आली आहे. सर्व घरे बेचिराख झालेली असल्याने सध्या एकाही घराची भिंत उभी दिसत नाही. त्यामुळे या ढिगाऱ्याखालून मृतदेह शोधण्यात अनेक अडचणी येत आहेत. बचावकार्य राबवण्यासाठी अद्ययावत यंत्रसाहित्य घटनास्थळी नेता येत नसल्याने ‘एनडीआरएफ’ व ‘टीडीआरएफ’च्या पथकाने बचावमोहीम सायंकाळी थांबवली..

..तर सगळे बचावले असते

दरड कोसळण्यापूर्वी दुर्घटनेचे काही संकेत मिळाले होते. जमिनीतून आवाज येऊ लागल्यानंतर ग्रामस्थ बाहेर आले. त्यानंतर ते सगळे एकत्र आले. या वेळीच सावध होत त्यांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले असते, तर अनेक जण वाचले असते. मी, सासू, सासरे, मुलगी आणि पती थोडक्यात बचावलो; परंतु आमचे आप्तस्वकीय यामध्ये आम्ही गमावले, हे आमच्यासाठी मोठे दु:ख आहे, असे सांगताना प्रत्यक्षदर्शी आणि तळीये गावातील रहिवासी प्रतिभा नीलेश कोंढाळकर यांच्या डोळ्यात अश्रू तरारले. तळीये वाडीतील दरड कोसळत असताना मोठा आवाज झाला. पाऊस कोसळत होता. पुन्हा दरड कोसळण्याच्या भीतीने कुणीही पुढे येत नव्हते. या दरडीची दहशत आमच्यामध्ये बसली होती, असे गावाच्या शेजारच्या वाडीतील जीत झिंजे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

दोन दिवसांपूर्वी आई-बाबांबरोबर बोलणे झाले होते. आज ते कुठे आहेत, याची कल्पनाही करवत नाही. येथे आल्यानंतर परिस्थिती पाहून अंगावर काटा आला. कोणीही व्यवस्थित माहिती देत नाही. आई-बाबांचा चेहरा दिसेल, याची वाट पाहत बसलो आहे.

- भावेश मालुसरे, ग्रामस्थ, तळीये

loading image
go to top