Weather Update: राज्यात पुन्हा एकदा पाऊस थैमान घालणार! हवामान खात्याकडून हाय अलर्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Weather Update

Weather Update: राज्यात पुन्हा एकदा पाऊस थैमान घालणार! हवामान खात्याकडून हाय अलर्ट

राज्यात वादळी वाऱ्यासह गारपिठांचा पाऊस धुमाकूळ घालत आहे. मागच्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकली आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. दरम्यान राज्यामध्ये पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

वादळी पावसाचा इशारा देत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

दरम्यान राज्यातील मध्य महाराष्ट्रातील नाशिक आणि नगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यातही हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्याना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भातील अकोला, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात गारपिठ आणि वादळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.

मागच्या काही दिवसांपासून विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाने हजेरी लावली. तर राज्यातील काही ठिकाणी जोरदार गारपिटीमुळे मोठे नुकसान झालं आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता आहे. 20 मार्चपर्यंत म्हणजे आणखी पुढचे दोन दिवस राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दोन दिवसांपूर्वी परभणी जिल्ह्यात वीज पडून चार जणांचा मृत्यू झाला आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.

20 मार्चपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजही मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता अधिक जाणवत आहे. तर मध्य महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

टॅग्स :rainWeather