
Local News : मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याआधी लोकलच वेळापत्रक तपासा; आज 'या' मार्गावर मेगाब्लॉक
आज रविवारी मुंबई लोकल वर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबई लोकलच्या मध्य मार्गावर देखभालीची कामं करण्यासाठी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. हार्बर मार्गावर मात्र मेगाब्लॉक नसणार आहे. हार्बर मार्गावरील सेवा सुरळीत राहणार आहे. यासंदर्भातील माहिती मध्यरेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे जारी करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून आज (19 मार्च 2023, रविवारी) विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेतला जाणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकातून सांगण्यात आलं आहे.
मध्यरेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आल्यानुसार, मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार 19 मार्च रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.40 या वेळेत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील व भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबून पुढे पुन्हा योग्य डाउन धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
घाटकोपर येथून अप धीम्या मार्गावरील अप जलद मार्गावर
घाटकोपर येथून सकाळी 10.41 ते दुपारी 3.52 वाजेपर्यंत अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई दरम्यान कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते पनवेल दरम्यान हार्बर मार्गावर कोणताही मेगाब्लॉक घेण्यात येणार नाहीये.