कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 November 2019

'महा' चक्रीवादळाचे रुपांतर अति तीव्र चक्रीवादळात झाले असून, ते आता पश्‍चिम-मध्य आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रावर घोंगावत आहे. गुरुवारी (ता. 7) पहाटे हे चक्रीवादळ दीव आणि पोरबंदर दरम्यान गुजरातच्या किनारपट्टीवर धडकेल. दरम्यान, उद्या बुधवार आणि गुरुवारी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार असून, कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

"महा' चक्रीवादळाचे रुपांतर अति तीव्र चक्रीवादळात
पुणे - 'महा' चक्रीवादळाचे रुपांतर अति तीव्र चक्रीवादळात झाले असून, ते आता पश्‍चिम-मध्य आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रावर घोंगावत आहे. गुरुवारी (ता. 7) पहाटे हे चक्रीवादळ दीव आणि पोरबंदर दरम्यान गुजरातच्या किनारपट्टीवर धडकेल. दरम्यान, उद्या बुधवार आणि गुरुवारी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार असून, कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

गेल्या 24 तासांत कोकण-गोव्यात तर पुण्यासह मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. मराठवाड्यात हवामान कोरडे होते. बुधवारी (ता. 6) कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे. तर, विदर्भात हवामान कोरडे राहील. उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मासेमारी करणाऱ्यांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आला आहे. गुरुवारीही दुसऱ्या दिवशी अशीच स्थिती राहील, असा अंदाज आहे.

मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण-गोवा आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्‍वर येथे 16 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

गेल्या 24 तासांतील किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
पुणे 20.8, मुंबई-कुलाबा 24.5, सांताक्रूझ 24.6, अलिबाग 25.3, पणजी गोवा 25.1, नगर 17, जळगाव 21.4, कोल्हापूर 21.9, मालेगाव 21.6, नाशिक 19.2, सांगली 21.4, सातारा 20.5, सोलापूर 22.1, उस्मानाबाद 21.6, औरंगाबाद 17.9, परभणी 20.5, नोंदड 20, बीड 21.4, अकोला 20.9, अमरावती 20, बुलढाणा 20.5, ब्रह्मपुरी 22.3, चंद्रपूर 23.8, गोंदिया 20.4, नागपूर 20.7, वाशिम 20.4, वर्धा 21.4 आणि यवतमाळ 19.4

पुण्यात बुधवारी मेघगर्जनेसह पाऊस
पुणे शहर आणि परिसरात मंगळवारी सायंकाळी आकाशात काळे ढग होते. बुधवारी कमाल तापमान 30 तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस राहील. तसेच, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटांसह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. ताशी 25 ते 30 किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्‍त केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rain chance in konkan goa central maharashtra marathwada