Monsoon Update : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर राहणार कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rain

राज्यात मॉन्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून कोकण, घाटमाथ्यावर जोर वाढत आहे.

Monsoon Update : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर राहणार कायम

पुणे - राज्यात मॉन्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून कोकण, घाटमाथ्यावर जोर वाढत आहे. बुधवारी (ता. १०) कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर आणि पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

राज्यात मंगळवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर काही भागात जोरदार सरींनी हजेरी लावली होती. मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली. रत्नागिरीच्या लांजा येथे सर्वाधिक ३३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. घाटमाथ्यावर बहुतांश भागात १०० ते २०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला. मॉन्सूनचा आस असलेल्या कमीदाबाच्या पट्ट्याची स्थिती सर्वसामान्य स्थिती म्हणजेच दक्षिणेकडे असून सध्या गुजरात ते केरळ किनारपट्टीलगत समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. या स्थितीमुळे पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून राज्यात पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत. राज्यात पुढील चार दिवस कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कायम राहणार असून किनारपट्टीलगत सोसाट्याचे वारे देखील वाहतील. तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये येत्या गुरुवारपर्यंत (ता. ११) मुसळधार सरींचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात मात्र मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

त्यातच बंगालच्या उपसागरात ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. दरम्यान ही प्रणाली आता वायव्य दिशेकडे सरकत असून त्याची तीव्रता ओसरण्याची शक्यता आहे. मॉन्सूनच्या पावसासाठी पोषक हवामानामुळे बुधवारी (ता. ११) गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. त्याचबरोबर कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर तसेच पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

पावसाचे अलर्ट देण्यात आलेले जिल्हे

रेड अलर्ट - गडचिरोली

ऑरेंज अलर्ट - पुणे, सातारा, वर्धा, रायगड, पालघर, रत्नागिरी, भंडारा, चंद्रपूर

येलो अलर्ट - वाशीम, यवतमाळ, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, नंदूरबार, अकोला, अमरावती, नाशिक, कोल्हापूर, गोंदिया, बुलडाणा

राज्यातील पावसाची नोंद (मिलिमीटरमध्ये) -

 • महाबळेश्‍वर - १००

 • पुणे - १७.२

 • रत्नागिरी - ३०

 • कोल्हापूर - ६

 • सातारा - ११

 • डहाणू - २५

 • सोलापूर - १६

 • चंद्रपूर - १९

 • गोंदिया - २७

 • वर्धा - ११

घाटमाथ्यावरील पावसाची नोंद (मिलिमीटरमध्ये) -

 • लोणावळा (टाटा) - ११९

 • लोणावळा (ऑफिस) - ११८

 • शिरगाव - २१४

 • दावडी - २६८

 • ताम्हिणी - २००

 • भिरा - २५१

 • अम्बोणे - १८७

 • कोयना (नवजा) - ११५

 • कोयना (पोफळी) - १५९