
राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढला आहे. पावसाच्या दमदार आगमनामुळे सर राज्यातील विविध विभागांमध्ये पावसाची सरासरी व सरासरीपेक्षा जास्त नोंद होत आहे.
राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढला
पुणे - राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढला आहे. पावसाच्या दमदार आगमनामुळे सर राज्यातील विविध विभागांमध्ये पावसाची सरासरी व सरासरीपेक्षा जास्त नोंद होत आहे. पोषक हवामानामुळे मॉन्सून सक्रिया झाला असून मंगळवारी (ता. १२) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यात पावसाच्या जोरदार सरींची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
सोमवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार सरींनी हजेरी लावली होती. उर्वरीत राज्यात बऱ्याच ठिकाणी पावासाची नोंद झाली. तर घाटमाथ्यावरील जोरदार पावसाने नद्या नाले ओसंडून वाहू लागले आहेत. संततधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाचा जोर असाच कायम राहणार असलून मंगळवारी (ता. १२) कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील नाशिक पुणे, कोल्हापूर जिल्ह्यांचा घाटमाथा, पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यांना रेड अलर्ट (अतिजोरदार पाऊस) देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा, औरंगाबाद, जालना, चंद्रपूर या जिल्ह्यांत पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, विदर्भासह राज्याच्या बहुतांश भागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
सध्या दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशमधील कमी दाब क्षेत्र सोमवारी (ता. ११) ओडिशाच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरावर सक्रिय होते. तसेच उद्यापर्यंत या कमी दाब क्षेत्राची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
राज्यात पावसाचा जोर का वाढला ?
हवामानाची स्थिती पाहता, गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीलगत समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मॉन्सूनचा आस दक्षिनेकडे कायम असून पूर्व किनाऱ्यावरील कमी दाबाची वाढणारी तीव्रता. त्यात राज्यावर पूर्व-पश्चिम दिशेने वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र. या प्रणालींमुळे राज्यात मॉन्सूनच्या पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून राज्यात सर्वदूर पावसाची स्थिती कायम आहे.
राज्यातील विभागांमध्ये सरासरी व सरासरीपेक्षा जास्त पाऊस -
जून महिन्यात पावसाने सरासरी देखील गाठली नाही. मात्र जुलै महिन्यात ही कसर भरून निघत आहे. हंगामातील पावसात आतापर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पाऊस नोंदला गेला आहे. यामध्ये सर्वाधिक जास्त मराठवाड्यात म्हणजेच सरासरीपेक्षा ४३ टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. कोकणात २०, मध्य महाराष्ट्रात ३ तर विदर्भात ८ टक्के जास्त पावसाची नोंद झाली.
विभागनिहाय पावसाची नोंद (मिलिमीटरमध्ये)
विभाग - सरासरी पाऊस - प्रत्यक्ष पडलेला पाऊस
कोकण - १०४०.५ - १२५२.३
मध्य महाराष्ट्र - २२९.९ - २३७.९
मराठवाडा - १८८.४ - २६९.८
विदर्भ - २६६.९ - २८८
राज्यात झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)
नगर - २
कोल्हापूर - १९
महाबळेश्वर - ७४
सांगली - ४
सातारा - ११
सोलापूर - २
मुंबई - ७
सांताक्रूझ - ९
अलिबाग - ६
रत्नागिरी - ७
डहाणू - ३५
औरंगाबाद - २
परभणी - ०.२
अकोला - ४
अमरावती - ११
ब्रम्हपूरी - २७
चंद्रपूर - १८
गोंदिया - ८
नागपूर - ४०
वर्धा - ७
Web Title: Rain Increase In Maharashtra State
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..