esakal | उत्तर कोकण, महाराष्ट्रामध्ये रिमझिम पावसाची शक्‍यता
sakal

बोलून बातमी शोधा

Rain

मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्र विरळ होत असल्याने राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हलक्‍या ते मध्यम सरी पडत आहेत. उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात येत्या बुधवारी (ता. 11) तुरळक ठिकाणी जोरदार; तर उर्वरित महाराष्ट्रात हलक्‍या ते मध्यम पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तर कोकण, महाराष्ट्रामध्ये रिमझिम पावसाची शक्‍यता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्र विरळ होत असल्याने राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हलक्‍या ते मध्यम सरी पडत आहेत. उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात येत्या बुधवारी (ता. 11) तुरळक ठिकाणी जोरदार; तर उर्वरित महाराष्ट्रात हलक्‍या ते मध्यम पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पालघर, रायगड, ठाणे, नाशिक, धुळे, नगर जिल्ह्याच्या काही भागांत गेल्या दोन दिवसांपासून जोरदार सरी कोसळत होत्या. मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये नाशिकमधील त्र्यंबकेश्‍वर येथे सर्वाधिक 141 मिलिमीटर; तर पिंपळगाव बसवंत येथे 126 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रात अनेक भागांत पावसाने उघडीप दिली.

कमी दाबाचे क्षेत्र पश्‍चिमेकडे सरकल्याने मंगळवारी गुजरात, पश्‍चिम मध्य प्रदेशात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला; तर उत्तर महाराष्ट्र, कोकणात पावसाची शक्‍यता आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाकडे सरकण्याचे संकेत असल्याने राज्यात पाऊस थांबणार आहे. शुक्रवारपासून (ता. 13) कोकण वगळता राज्यात पावसाची उघडीप शक्‍य असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

शहरात दोन दिवस ढगाळ वातावरण
पुण्यात पुढील दोन दिवस आकाश समान्यतः ढगाळ रहाणार असून, हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता 25 ते 50 टक्के असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. शहरात सकाळी साडेआठ वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासांमध्ये 3.1 मिलिमीटर पवासाची नोंद झाली. शहरात एक जूनपासून आतापर्यंत 820 मिलिमीटर पाऊस पडला आहे.