राज्याला पावसाने झोडपले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

उजनीच्या पाणीपातळीत होतेय वाढ
सोलापूर - सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या वरच्या बाजूला पुणे जिल्ह्यात धरणक्षेत्रात पुन्हा एकदा जोरदार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे उजनी धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासात पुणे परिसरातील मुळा-मुठा व भीमा नदीच्या खोऱ्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. या भागातून वाहणाऱ्या सर्वच नद्या जवळपास दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात उजनीकडे येत आहे. खडकवासला, मुळशी, चासकमान, टेमघर, वडीवळे, वरसगवा, आंध्रा, पवना, पानशेत, कासारसाई या सर्वच धरणक्षेत्रात जवळपास १०० मिलिमीटरच्या पुढे पाऊस पडला आहे.

महामार्ग, रेल्वे, विमानसेवा विस्कळित; नद्या-नाले ‘ओव्हरफ्लो’
पुणे/मुंबई - मॉन्सून सक्रिय झाल्याने मुंबई, कोकणसह मध्य महाराष्ट्रात दमदार पाऊस पडत आहे. मुंबई-कोकणला झोडपल्याने अनेक सखल भागांत पाणी साचले, दरडी कोसळल्या, झाडे पडली, तसेच नद्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने जनजीवन विस्कळित झाले. घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाने जोर धरल्याने नद्यांना पूर आला. विदर्भ, मराठवाड्यातही पावसाने मध्यम स्वरूपाची हजेरी लावली आहे.

ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. दुकानांमध्येही पाणी घुसल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात असलेल्या मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खेड तालुक्यांत मुसळधार पाऊस पडत आहे. धरणांच्या पाणलोटात सुरू असलेल्या पावसाने नद्या, नाल्यांना पूर आल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.  

नाशिक जिल्ह्यात शनिवारी (ता. २७) दुपारनंतर संततधार सुरू आहे. जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात सह्याद्री पर्वतरांगांच्या घाटमाथ्यावर गेल्या दोन दिवसांपासून संततधारेमुळे इगतपुरी तालुक्यात दारणा धरण पाणलोट क्षेत्रातील घोटी, इगतपुरी, भावली या परिसरात झालेल्या पावसामुळे धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली. नगर जिल्ह्यामध्ये अजून पावसाचा जोर नसला, तरी भंडारदरा आणि मुळा धरणाच्या पाणलोटात मात्र जोरदार पाऊस पडत आहे.कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असल्याने नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. 

ठाण्यातील घोडबंदर परिसरात साचलेल्या पाण्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक बंद पडली होती. बदलापूर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकात पाणी साचल्याने रेल्वेसेवेचा बोजवारा उडाला होता. 

रेल्वे वाहतुकीवर परिणाम
मुंबई आणि परिसरामध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम शनिवारी रेल्वेसेवेवर झाला. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या सिंहगड, इंद्रायणी एक्‍स्प्रेस आणि डेक्कन क्वीन रद्द करण्यात आल्या. 

खानदेशात सर्वदूर पाऊस 
जळगाव - खानदेशात शुक्रवारी (ता. २६) रात्री व मध्यरात्रीनंतर सर्वत्र पावसाने हजेरी लावली. जामनेर, सातपुडा पर्वतातील काही भागांत अतिवृष्टी म्हणजेच सलग ६० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात सरासरीच्या सुमारे ३५ टक्के पाऊस झाला आहे.    

चिपळूणमध्ये जलप्रलय
रत्नागिरी - मुंबईसह रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाने खेड, चिपळूण जलमय झाले होते. वाशिष्ठी, जगबुडी नद्यांनी रौद्ररूप धारण केले. वाशिष्ठी कोपल्याने पाणी चिपळूण बाजारपेठेत घुसले. मुंबई-गोवा महामार्गावर जगबुडी पूल वाहतुकीला बंद ठेवण्यात आल्याने रत्नागिरीकडे येणाऱ्यांची पंचाईत झाली.

हतनूरचे आठ दरवाजे उघडले
जळगाव - खानदेशात सर्वत्र कमी-अधिक पाऊस झाल्याने प्रकल्पांमधील जलसाठाही वाढला आहे. जामनेर (जि. जळगाव) तालुक्‍यातील तोंडापूर प्रकल्प १०० टक्के भरला आहे. तर तापी नदीवरील मुक्ताईनगरनजीकच्या हतनूर धरणाचे आठ दरवाजे अर्धा मीटरने शनिवारी (ता. २७) सकाळी नऊ वाजता उघडण्यात आले. 

मुंबईची सर्वार्थाने दयनीय अवस्था झाली आहे. आर्थिक राजधानी वगैरे ठीक आहे. पण, आम्ही प्रामाणिकपणे कर भरतो, त्या मोबदल्यात काय मिळतं? 
- केदार शिंदे, दिग्दर्शक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Monsoon Maharashtra