esakal | राज्यात चार दिवस मुसळधार पाऊस; कोकणात अतिवृष्टीचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात चार दिवस मुसळधार पाऊस; कोकणात अतिवृष्टीचा इशारा

राज्यात चार दिवस मुसळधार पाऊस; कोकणात अतिवृष्टीचा इशारा

sakal_logo
By
नामदेव कुंभार

पुणे : राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण तयार होत आहे. आज (गुरुवारी) राज्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. उद्या (शुक्रवार) कोकणात बहुतांशी भागात पावसाचा प्रभाव वाढणार असून, सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. काही भागांत पाऊस नसल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. राज्यातील काही ठिकाणी उष्णतेची लाट आल्याने उकाड्यात चांगलीच वाढ झाली आहे. जळगाव येथे मागील दोन दिवसांपासून उच्चांकी तापमानाची नोंद होत आहे. बुधवारी (ता. ७) सकाळी आठ वाजेपर्यंत जळगाव येथे सरासरीच्या तुलनेत सहा अंश सेल्सिअसने वाढ होऊन ३९.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.

जळगावसह पुणे, महाबळेश्‍वर, सातारा, मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वर्धा, यवतमाळ येथे कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान २४ ते ३९ अंश सेल्सिअस, कोकणात ३२ ते ३३ अंश सेल्सिअस, मराठवाड्यात ३४ ते ३५ अंश सेल्सिअस, तर विदर्भात ३५ ते ३९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते.

मॉन्सूनला सरकण्यास पोषक स्थिती :

उत्तर भारतात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) प्रवास सुरू होणार आहे. पुढे सरकण्यास पोषक स्थिती तयार होत आहे. शनिवार (ता. १०) पासून मॉन्सूनचा वायव्य भारतातील प्रवास सुरू होणार असून, दिल्लीसह, पंजाब, हरियाना, राजस्थानच्या काही भागांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली.

हेही वाचा: मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार, खातेनिहाय मंत्र्यांची यादी

येथे होणार जोरदार पाऊस :

गुरुवार - रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नगर, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संपूर्ण मराठवाडा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, गोंदिया, नागपूर

शुक्रवार - रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ

शनिवार - ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, नांदेड, हिंगोली, वाशीम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर

रविवार - संपूर्ण कोकण, कोल्हापूर, पुणे, सातारा, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बुलडाणा, वाशीम, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर

हेही वाचा: मोदी मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे आठ मंत्री, पाहा कुणाकडे कोणतं खातं?

ठिकठिकाणी पावसाच्या सरी

राज्यात काही भागांत ढगाळ वातावरण तयार होत आहे. यामुळे ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहे. बुधवारी (ता. ७) सकाळी आठ वाजेपर्यंत कोकणातील तळा येथे २० मिलिमीटर पाऊस पडला. तर मुंबईतील कुलाबा, सांताक्रूझ, रायगडमधील माणगाव, श्रीवर्धन, मध्य महाराष्ट्रातील धुळे, सांगलीतील मिरज, साताऱ्यातील सातारा येथेही हलका पाऊस पडला. मराठवाड्यातील नांदेडमधील उमरी येथे २७ मिलिमीटर पाऊस पडला. बीडमधील पाटोदा, जालन्यातील परतूर, नांदेडमधील नायगाव खैरगाव, विदर्भातील गडचिरोलीतील कुरखेडा, नागपूरमधील रामटेक, नागपूर येथेही पावसाच्या हलक्या सरी पडल्या. काही ठिकाणी मेघगर्नजेसह वादळी तुरळक सरी बरसल्या.

loading image