पावसाची सर्वदूर हजेरी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

पुणे -राज्याच्या विविध भागांत पावसाने मंगळवारी सर्वदूर हजेरी लावली. त्यामुळे पावसाने ओढ दिलेल्या जिल्ह्यांची संख्या दहावरून दोनपर्यंत खाली आली. राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये पावसाने तेथील सरासरी गाठली तर, सात जिल्ह्यांमध्ये सरासरी ओलांडल्याची माहिती हवामान खात्याने प्रसिद्ध केली आहे. 

पुणे -राज्याच्या विविध भागांत पावसाने मंगळवारी सर्वदूर हजेरी लावली. त्यामुळे पावसाने ओढ दिलेल्या जिल्ह्यांची संख्या दहावरून दोनपर्यंत खाली आली. राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये पावसाने तेथील सरासरी गाठली तर, सात जिल्ह्यांमध्ये सरासरी ओलांडल्याची माहिती हवामान खात्याने प्रसिद्ध केली आहे. 

दुष्काळी भाग असलेल्या मराठवाड्याला श्रावणसरींनी दिलासा दिला आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वी मराठवाड्यासह उत्तर आणि महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये अडीच महिन्यांच्या सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याचे चित्र दिसत होते. दोन ते तीन दिवसांपासून पावसाच्या दमदार सरी राज्याच्या विविध भागांमध्ये पडत आहेत. त्यामुळे औरंगाबाद, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर या पावसाने ओढ दिलेल्या भागात आता सरासरी गाठली. नंदूरबार आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये मात्र तेथील सरासरीच्या तुलनेत उणे 25 ते उणे 27 टक्के पाऊस पडला आहे. उर्वरित महाराष्ट्रातील 27 जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठली आहे. त्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांचा समावेश आहे. नाशिक, पुणे आणि सातारा, अकोला, वाशीम, नांदेड आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 

राज्यात पुढील चोवीस तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशाराही हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागांमध्ये पाऊस पडेल, असेही खात्याने स्पष्ट केले आहे. 

राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद महाबळेश्‍वर येथे 39 मिलिमीटर झाली. नगर, मालेगाव, जळगाव, कोल्हापूर या भागातही पाऊस पडला. 

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाच्या सरींचा जोर येत्या गुरुवारपासून (ता. 23) कमी होण्याची शक्‍यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मध्य प्रदेशच्या भागावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्याच्या विविध भागांत पाऊस पडत आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता पुढील दोन दिवसांमध्ये कमी होईल. त्यामुळे पावसाचा जोर ओसरण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरावर आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्याचा नेमका परिणाम महाराष्ट्रावर किती होईल, हे पुढील दोन दिवसांमध्ये स्पष्ट होईल, असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rainfall in maharashtra