
काकांनंतर पुतण्याही अयोध्येत; आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याचा मुहुर्त ठरला!
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ५ जूनला आयोध्येला जाणार असून आदित्य ठाकरेसुद्धा आयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यासांदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली आहे.
(Aditya Thackeray Ayodhya Visit)
राज ठाकरे यांच्या ५ जूनच्या दौऱ्यानंतर १० जून रोजी आदित्य ठाकरे हे आयोध्येला जाणार आहेत. हा राजकीय दौरा नसल्याचीही माहिती संजय राऊतांनी दिली आहे.
जर कुणी नकली भावाने किंवा राजनैतीक भावना ठेऊन जात असेल तर त्याच्यापासून सावधान राहायला पाहिजे असं त्यांनी बोलताना सांगितलं. जे राजनैतिक स्वार्थासाठी जातात त्यांना विरोध केला जातो असाही त्यांनी राज ठाकरे यांना टोला लावला आहे. आदित्य ठाकरे १० जूनला आयोध्येला जाऊन प्रभूरामचंद्राचं दर्शन आणि आशिर्वाद घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
तसेच आमचा कोणत्याही प्रकारचा राजनैतिक दौरा नाही. आम्ही आयोध्येला जायची आधीच घोषणा केली होती. त्यासाठी देशभरातून आणि महाराष्ट्रातून लाखो शिवसैनिक आयोध्येत हजर असणार आहेत. कोण असली आणि कोण नकली हे लोकं दाखवून देतील असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी लावला आहे.
दरम्यान सध्या राज्यात भोंग्याच्या वादावरुन तापलेल्या वातावरणात मुख्यमंत्री दबावाखाली काम करतात का असा प्रश्न विचारल्यावर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दबावाखाली काम करत नसून त्यांचा इतरांवर दबाव आहे असं ते बोलताना म्हणाले आहेत.