
'मुख्यमंत्री ब्राम्हण असावा की अन्य कोण हे ज्याचं बहुमत असेल त्यावर ठरेल'
सहकाऱ्यांना मागे सोडून पळणारा मुख्यमंत्री नसावा, भुजबळांचा रोख कुणावर?
मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी वेगाने घडल्या आहेत. राजकीय वातावरण तापलं असल्याने आरोपप्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. राजकीय वर्तुळात अनेक मुद्दे गाजत आहेत. यातच भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांमध्ये दावे-प्रतिदाव्यांचं राजकारण रंगलं आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी भाजप नेते रावसाहेब (Raosaheb Danve) यांनी केलेल्या एका वक्तव्याचा आता राष्ट्रवादीकडून (NCP) खरपून समाचार घेण्यात आला आहे. दानवेंच्या त्या विधानावर मंत्री छगन भुजबळ यांनी टीका केली आहे.
मला ब्राम्हण मुख्यमंत्री झालेला पाहायचा आहे, असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं होतं. या वक्तव्यावरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal ) पत्रकारांशी बोलताना भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री ब्राम्हण असावा की अन्य कोण हे ज्याचं बहुमत असेल त्यावर ठरेल. मात्र, सर्वांना सोबत घेऊन चालणारा मुख्यमंत्री असावा. सहकाऱ्यांना मागे सोडून पुढे पळणारा मुख्यमंत्री नसावा, असा टोला छगन भुजबळ यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र पुरोगामी राज्य असून त्याला अनेक चांगल्या वैचारीक परंपरा आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा मुख्यमंत्री असावा. गोरगरीब जनतेच्या प्रश्नांचा विचार करणारा मुख्यमंत्री असावा. त्याने जनतेची काळजी घेतली पाहिजे, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे.
काय म्हणालेत रावसाहेब दानवे?
रावसाहेब दानवे यांनी जालन्यात बोलताना मी ब्राह्मणाला या राज्याचा मुख्यमंत्री झालेलं पाहू इच्छितो, असं वक्तव्य केलं आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका आल्याने आमच्याकडे लक्ष ठेवा. वेगवेगळ्या ठिकाणी ब्राह्मणांना प्रतिनिधित्व द्या. एकापेक्षा जास्त ब्राह्मण जालना महापालिकेमध्ये निवडणून द्या असा आपल्या बोलण्याचा अर्थ होता. पण ही विनंती मला लागू होत नाही. कारण मी ब्राह्मणाला केवळ नगरसेवक किंवा नगराध्यक्ष झालेला पाहू इच्छित नाही. मी ब्राह्मणाला या राज्याचा मुख्यमंत्री झालेला पाहू इच्छितो असे रावसाहेब दानवे म्हणाले.