
'तू मिसळ महोत्सव घे, मी नक्की येईन'; राज ठाकरेंचं वसंत मोरेंना आश्वासन
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा भोंग्याचा मुद्दा राज्यासह देशात गाजत आहे. त्यांनी ३ मे ही मशिदींवरील भोंगे उतरवण्यास शेवटची तारीख दिली होती. मात्र त्यानंतर म्हणजे ४ मे पासून मशिदींसमोर मनसेचे कार्यकर्ते हनुमान चालीसा लावतील असा इशारा दिला होता. त्यासाठी आंदोलनेही झाली. यात मनसेचे वसंत मोरे कुठेच दिसले नाहीत. गेल्या महिन्यात पुण्यातील राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाआरतीला ते गैरहजर होते. अखेर शनिवारी मोरे यांनी महाआरती केली. तसेच राज यांची भेटही घेतली आहे. वसंत मोरे पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी न झाल्याने पुन्हा त्यांच्या पक्ष सोडण्याबद्दल चर्चेला उधाण आले होते.
आंदोलनाच्या दिवशी ते तिरुपती बालाजीच्या देवदर्शनासाठी गेले होते. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले. दुसरीकडे स्वतः मोरे यांनी तिरुपती बालाजी दौरा पूर्वनियोजित असल्याचे स्पष्टीकरण दिले. पुण्यातील कात्रज येथे शनिवारी त्यांनी महाआरतीचे आयोजन केले होते. दुसरीकडे राज ठाकरेही याच दिवशी पुण्यात होते. ते न आल्याने पुन्हा चर्चेला उधाण आले. महाआरतीनंतर वसंत मोरे यांनी राज यांची भेट घेतली. प्रसारमाध्यमांमुळेच राज ठाकरे पुण्यात (Pune ) येणार असल्याची माहिती मिळाली.
मी त्यापूर्वीच महाआरतीचे आयोजन केले होते. याबद्दल राज ठाकरेंना संदेश पाठवून कळवले होते. आरतीनंतर त्यांची भेट घेतल्याचे मोरे यांनी सांगितले. राज ठाकरेंना महाआरतीला येता आले नाही. पण, वसंत तू मिसळ महोत्सव घे, मी नक्की येईन, असे आश्वासन राज ठाकरे यांनी दिल्याचे वसंत मोरे (Vasant More) यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.