Ajit Pawar Raj Thackeray | राज ठाकरेंसह भाजपाची सभा अवघ्या काही तासांवर; अजित पवार म्हणतात... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपमुख्यमंत्री अजित पवार
राज ठाकरेंसह भाजपाची सभा अवघ्या काही तासांवर; अजित पवार म्हणतात...

राज ठाकरेंसह भाजपाची सभा अवघ्या काही तासांवर; अजित पवार म्हणतात...

आज महाराष्ट्राच्या स्थापनेला ६२ वर्षे पूर्ण झाली. यंदाच्या महाराष्ट्र दिनाची जोरदार चर्चा होतेय. त्याचं कारणही तसंच आहे.एकीकडे राज ठाकरेंची भव्य आणि बहुचर्चित सभा तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि भाजपाची बुस्टर डोस सभा. यामुळे राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं असून घडामोडींना वेग आला आहे. या सगळ्या सभांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.

अजित पवार आज पुण्यातल्या पोलीस मैदानावर महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राज्यातल्या सभांबद्दल अजित पवार म्हणाले, "सभा होतायत, त्यानिमित्त एकच सांगतो की, जातीय सलोखा ठेवणं आणि महाराष्ट्रात वातावरण कुठेही खराब होणार नाही, हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. कोणीही आपले विचार मांडत असताना, मतं मांडत असताना समाजात तेढ निर्माण होईल, कोणाच्या भावना भडकवल्या जातील, वातावरण खराब होईल, अशी वक्तव्यं करू नयेत आणि तसं वागूही नये."

अजित पवार पुढे म्हणाले,"प्रत्येकाला आपले विचार मांडायचा अधिकार आहे. कदाचित महाराष्ट्र दिनानिमित्त या सभा आयोजित केल्या असतील. पण सभांना परवानगी त्या त्या भागातले संबंधित अधिकारी देत असतात. तसंच औरंगाबाद इथल्या सभेला परवानगी देताना काही अटी घालून दिल्या आहेत. त्या अटींचं संबंधितांनी पालन करावं, जेणेकरून वातावरण चांगलं राहील."