
राज ठाकरे 'मराठी हृदयसम्राट'; इतर उपाधी न लावण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना
मुंबई: राज ठाकरेंच्या नावापुढे इतर नवीन कोणतीही उपाधी लावण्याचा उद्योग करु नये, असे स्पष्ट आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना यासंदर्भातील सूचना देण्यात आली आहे. त्याचं पालन करण्याचे आदेशही दिले आहेत. राज ठाकरेंच्या नावापुढे 'मराठी हृदयसम्राट' हीच उपाधी लागणार, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली आहे.
हेही वाचा: Sanjay Raut: राऊतांना राणेपुत्रांचे खोचक टीकेने प्रत्युत्तर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांसाठी एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, "महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेच्या हृदयात सर्वोच्च स्थान असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या नावापुढे सध्या प्रचलित असलेल्या “मराठी हृदयसम्राट” या उपाधी व्यतिरिक्त इतर नवीन कोणतीही उपाधी लावण्याचा उद्योग करू नये. कृपया या सूचनेचे तंतोतंत पालन व्हावे ही नम्र विनंती."
काय आहे हे प्रकरण?
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिनसैनिक 'हिंदुहृदयसम्राट' असे म्हणतात. मात्र, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लावलेल्या एका बॅनरमुळे पुन्हा एकदा यावरुन चर्चा सुरु झाली होती. थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनाच हिंदुहृदयसम्राट म्हणणारा बॅनर लावण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी घाटकोपरमध्ये राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या कार्यालयचे उद्घाटन होते. त्यासाठी कार्यकर्त्यांनी भले मोठे बॅनर लावले होते. त्यावर राज ठाकरे यांच्या नावासमोर हिंदुहृदयसम्राट असे लिहले होते. त्यामुळे राज ठाकरेंच्या लावलेल्या त्या बॅनरची सध्या चर्चा होत होती.
Web Title: Raj Thackeray Marathi Hriday Samrat Mns Notice To All Volunteers
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..