
राज ठाकरेंवर आज कारवाई होणार? मनसेची संतप्त प्रतिक्रिया
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबादच्या सभेमुळे अडचणीत आले आहेत. या सभेसाठी पोलिसांनी राज ठाकरेंना काही अटी घालून दिल्या होत्या. या अटींचं पालन न केल्यास पोलीस राज ठाकरेंवर कारवाई करणार असा इशाराही देण्यात आला होता. आता त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाईस सुरूवात केली आहे. मनसेच्या अनेक नेत्यांना नोटीसा पाठवण्यास पोलिसांनी सुरूवात केली आहे.
राज ठाकरे यांच्यावरही कारवाई होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. संदीप देशपांडे म्हणाले, "आम्ही दहशतवादी नाही आहोत, ज्यापद्धतीने सरकार वागतंय. एक साधी भूमिका मनसे अध्यक्षांनी मांडली की मशिदींवर अनधिकृत भोंगे आहेत ते उतरवा. तर त्यावर कारवाई करायचं सोडून आमच्यावर कारवाई करा, राज ठाकरेंवर कारवाई करा, हे चालवलंय. आम्ही काय अतिरेकी आहोत का?का उद्धव साहेबांच्या भाषेत आम्ही ओसामा बिन लादेन आहोत की आम्हाला तुम्ही या पद्धतीने वागवताय. ज्या गोष्टी अनधिकृत आहेत, त्या काढा, विषय संपेल. पण त्यांना ते करायचं नाही. त्यांचं लांगुलचालन करायचंय आणि कारवाई आमच्यावर करायचीये.हेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत का असा प्रश्न पडतोय. अशा पद्धतीची वागणूक तुम्ही देत असाल तर तुम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र आहात का? बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः सांगितलं होतं की मशिदीवरचे भोंगे उतरवले पाहिजेत. मग तुम्ही आमच्यावर कारवाई का करताय? "
हेही वाचा: राज ठाकरेंवर आजच कारवाई, गृहमंत्र्यांना भेटताच DGP 'अॅक्शन मोड'मध्ये
मनसे नेते नितीन सरदेसाई म्हणाले की, नोटीस नाही ही सरकारची भेट आहे. जनता पाहतेय सरकार कसं चाललंय.आम्ही साधीशी गोष्ट सांगितली होती, जे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही अनधिकृत गोष्टी ठेवतायत, त्यांच्यावर कारवाई करा, तर ती कारवाई न होता दुर्दैवाने आमच्या कार्यकर्त्यांवर आणि आमच्यावर कारवाई होत आहे, एवढंच मी आत्ता सांगू शकतो.
Web Title: Raj Thackeray Police Action Notices To Mns Leaders Rajneesh Sethi Dgp
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..