
Maharashtra Education: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात पहिलीपासून हिंदी विषय तृतीय भाषा म्हणून शिकवण्याच्या शैक्षणिक धोरणाचा विरोध केला. पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राचं शैक्षणिक धोरण हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. मी यावर सविस्तर बोलणार आहे. महाराष्ट्र सरकारनं नव्या शैक्षणिक धोरणात पहिलीपासून हिंदी सक्तीची करण्याचा निर्णय घेतलाय. मी दोन पत्रं आतापर्यंत दिली आहेत. या दोन्ही पत्राचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली. या दोन पत्रातून सुरुवातीला करण्यात आलेला विरोध आणि सरकारने हिंदी सक्ती करू नये अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. महाराष्ट्र आपल्या भाषेची अस्मिता कधी जपणार असा प्रश्न विचारला होता. यानंतर राज ठाकरे यांनी तिसरं पत्र राज्यातल्या मुख्याध्यापकांना लिहिलं असल्याचं सांगितलं. हे पत्र राज ठाकरे यांनी वाचून दाखवलं.