Vidhan Sabha 2019 : मनसेच ठरलं! राज ठाकरे उतरणार मैदानात

ज्ञानेश्‍वर बिजले 
रविवार, 29 सप्टेंबर 2019

मनसेचं शेवटी ठरलं. निवडणूक लढवायची. राज ठाकरे याची घोषणा सोमवारी इच्छुकांच्या मेळाव्यात करतील. निवडणुकीच्या रणधुमाळीत शंभरपेक्षा अधिक जागांवर मनसेचे इंजिन धावणार असल्याने, कार्यकर्त्यांत उत्साहाचे उधाण आले आहे. 

विधानसभा 2019 : पुणे : मनसेचं शेवटी ठरलं. निवडणूक लढवायची. राज ठाकरे याची घोषणा सोमवारी इच्छुकांच्या मेळाव्यात करतील. निवडणुकीच्या रणधुमाळीत शंभरपेक्षा अधिक जागांवर मनसेचे इंजिन धावणार असल्याने, कार्यकर्त्यांत उत्साहाचे उधाण आले आहे. 

मनसे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने, भाजप-शिवसेना युतीच्या तंबूत मात्र घबराट उडणार आहे. कारण, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ठाकरे यांनी शाब्दिक हल्ला चढविला तो थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरच. 'लाव रे व्हिडिओ' या पद्धतीने त्यांनी केलेला प्रचार तेव्हा प्रचंड लोकप्रिय ठरला. ठाकरे आता केंद्राबरोबरच राज्यातील भाजपच्या कारभाराची लक्‍तरेही वेशीवर मांडतील. त्याचा फायदा मनसेच्या उमेदवारांसोबतच विरोधी पक्षांनाही होणार आहे. 

ईव्हीएम यंत्राद्वारे मतदान घेण्यास विरोध करण्यासाठी ठाकरे निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या मनस्थितीत होते. तशी त्यांची भूमिका उघडपणे मांडण्यात आलेली नव्हती. मात्र, त्यावर जोरदार चर्चा झाली. दरम्यान, पक्षातील कार्यकर्त्यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची आग्रही विनंती वारंवार ठाकरे यांच्यासमोर मांडली. त्यावर राज ठाकरे त्यांची भूमिका सोमवारी पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांच्या मेळाव्यात मांडणार आहेत. मनसेकडे 118 मतदारसंघातून इच्छुकांचे अर्ज आले आहेत. 

लोकसभा निवडणुकीच्या वेळीच मनसेने केलेल्या पाहणीत राज्यातील 63 मतदारसंघांमध्ये त्यांची निश्‍चित स्वरुपाची ताकद आहे. तेथील निवडणुकीच्या निकालावर ते परिणाम करू शकतात. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद या महानगरांत, तसेच विदर्भ, मराठवाड्यातील ग्रामीण भागात मनसेचे उमेदवार निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरतील. किमान पंचवीस मतदारसंघात ते पहिल्या दोन क्रमांकात लढत देण्याच्या स्थितीत आहेत. विशेषतः महानगरांमध्ये अनेक मतदारसंघांत मनसेमुळे युतीच्या उमेदवारांची गणिते बिघडण्याची स्थिती निर्माण होणार आहे. 

सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) कारवाईच्या विरोधात राष्ट्रवादीने गेल्या पाच दिवसांत केलेल्या प्रतिहल्ल्याने सत्ताधारी भाजप गोंघळून गेली. ठाकरे यांची ईडीने चौकशी केल्यानंतर, ते गप्प का राहिले आहेत, अशी चर्चा त्यांचे विरोधक करीत आहेत. मात्र, ठाकरे बोलू लागले, तर, त्यांच्या शाब्दिक वाराने भाजपचे अनेक रथीमहारथी घायाळ होतील, असा विश्‍वास मनसेच्या कार्यकर्त्यांना वाटतो. त्यामुळे, राज ठाकरे सोमवारी काय भूमिका मांडणार, यांकडे मनसेच्या कार्यकर्त्यांसह सर्वच राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray will contest Vidhan Sabha 2019 election