इंजिनाची दिशा बदलल्याने राजकीय वारे बदलेल? 

Raj Thackray
Raj Thackray

शिवसेनेतून बाहेर पडत राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापन करण्याची हिंमत दाखविली होती. त्यांच्या व्यक्तिगत करिष्म्याच्या जोरावर त्यांनी सुरवातीच्या काळात चांगलेच राजकीय यश मिळविले होते. विशेष म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनी शिवसेनेशी दोन हात केले होते. मुंबई, पुणे महापालिका निवडणुकीत चांगले यश मिळविले. तसेच विधानसभेत पहिल्याच फटक्‍यात बारा आमदार निवडून आले. तर नाशिक मध्ये सत्ता आली. यामुळे मनसे राज्यात बाळसे धरेल असे वाटत होते.

महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट काढणाऱ्या राज यांच्या मनसेकडे एक राजकीय पर्याय म्हणून मतदारांनी पाहिले. याकाळात मनसेचे इंजिन चांगलेच वेगाने दौडत होते. ते डावीकडून उजवीकडे धावणारे इंजिन हे मनसेचे निवडणूक चिन्ह होते. परंतु, सन 2012 मध्ये पक्षाने निवडणूक आयोगाला विनंती करून या चिन्हाची दिशा बदलली. अर्थात त्यानंतर बरेच राजकीय वारे वाहिले.

राज यांनीच गुजरातचा दौरा करून मोदी पुराण गाणे सुरू केले. ज्यावेळी महाराष्ट्रात भाजपचे नेतेही नरेंद्र मोदी यांच्या नावाचा जप करीत नव्हते त्यावेळी राज हे मोदी यांनी गुजरात मध्ये केलेल्या विकासाची माहिती लाखोंच्या सभेत जनतेला देत होते. मोदी यांची केलेली प्रसिद्धीस नंतर अंगलट येईल असे राज यांना स्वप्नातही वाटले नसावे.

सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना व भाजप यांची युती असताना राज यांनी भाजपच्या नव्हे तर शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभे केले. मनसेचे उमेदवार मोदींचे हात बळकट करतील अशी राजकीय चाल त्यांनी खेळली. परंतु, मोदी लाटेत मनसे पराभूत झाली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत तर मनसेचा केवळ एकच उमेदवार निवडून आला. साऱ्या प्रमुख नेत्यांना दारुण पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर पक्षाला गळती सुरू झाली ती अद्याप थांबायला तयार नाही.

नाशिकमध्ये सत्ता येऊनही अपेक्षित विकास साधता आला नाही. टोलच्या झोलमध्ये पक्षाचाच गोल झाला. त्यातच ज्या मोदी यांचे पुराण गायले त्यांच्यावरच टीका सुरू झाली. त्यामुळे जनमानसातील स्थान कमी होत गेले. पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी फारसे भरीव काम न केल्याने मिळालेला जनाधारही आपोआपच कमी होत गेला. या काळात पुन्हा शिवसेनेने जम बसविला. तर भाजप खूपच पुढे गेली. पक्षाच्या कार्यकर्त्यांना कार्यक्रम न दिल्याने अखेरीस व्हायचे तेच झाले. पक्ष संघटना कमकुवत होत गेली. नाशिकमध्ये सुंदोपसुंदी झाली. पक्षाचे बिनीचे शिलेदार पक्ष सोडून गेले. राज्यभरात तीच स्थिती आहे. अशावेळी कसलेला राजकीय नेता हार न मानता पक्षाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करतो. राज ही तसे आहेतच. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक करिष्म्यावर पक्षाचे नवनिर्माण करण्याचा प्रयत्न चालविला असला तरी पक्ष संघटनेत आलेली मरगळ ते घालवू शकलेले नाहीत.


आगामी महापालिका निवडणुका या मनसेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण अशा आहेत. त्यामुळेच की काय पक्षाने त्यांचे निवडणूक चिन्हापासूनच बदल करण्यास सुरवात केली आहे. इंजिन या पक्षाच्या निवडणूक चिन्हाची दिशा पूर्ववत म्हणजेच डावीकडून उजवीकडे करण्यात आली आहे. अर्थात इंजिनाची दिशा बदलल्याने राज्यातील राजकीय वारे बदलणार का? हाच खरा प्रश्‍न आहे. थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू असलेल्या राज यांची मंत्र-तंत्र, गंडे-थोरे, ज्योतिष यावर विश्‍वास नसलेले नेते अशीच प्रतिमा आहे. तरीही नऊ या जादुई आकड्यावर विश्‍वास असणाऱ्यांच्या पक्षाच्या निवडणूक चिन्हाची दिशा का बदलली? याबाबत मात्र आता तर्कवितर्क सुरू झाले आहेत. अर्थात इंजिनाची दिशा बदलली तरी जनता त्यामागे धावणार का हे आगामी काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com