
खेड-दापोली-मंडणगडचे आमदार योगेश कदम यांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणे पसंत केले आहे.
शिवसैनिक संभ्रमात
रत्नागिरी : खेड-दापोली-मंडणगडचे आमदार योगेश कदम यांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणे पसंत केले आहे. खेड, दापोली या दोन्ही तालुक्यात त्यांचा चांगला प्रभाव आहे. मागील महिन्यांत रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांच्या दापोलीतील अनधिकृत बंगल्याप्रकरणानंतर आमदार कदम यांच्याविरोधातील फळी सक्रिय झाली होती. त्यामुळे शिवसेनेत गेले काही दिवस गोंधळाचे वातावरण होते.
खेड-दापोली पाठोपाठ रत्नागिरीचे आमदार तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे गुवाहाटीला रवाना झाल्याचे वृत्त आले. त्यामुळे रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघात खळबळ उडाली. एकनाथ शिंदे यांच्या गटात योगेश कदम सामील झाल्यानंतर दापोलीतील समर्थकांनी पाठबळ देण्यासाठी चौकात उतरुन घोषणाबाजी केली होती. त्यामुळे या मतदारसंघातील वातावरण ढवळून निघाले. रत्नागिरीचे आमदार उदय सामंत गुवाहाटीला रवाना झाल्याचे वृत्त आल्यानंतर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी सावध भूमिका घेतली आहे. सामंत हे नक्की तिकडे रवाना झाले का, याबाबत अधिकृत माहिती मिळेपर्यंत वक्तव्य करण्यास पदाधिकाऱ्यांनी नकार दिला. वरिष्ठांचे आदेश आणि स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच भूमिका घेणार असल्याचेही सांगितले.
शिंदे गटाला सामील झाल्याच्या वृत्तानंतर बाजूने किंवा विरोधात कोणतीच भूमिका शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाकडून उमटलेली नव्हती. खेड-दापोलीत एक दिवसानंतर योगेश कदम यांच्या बाजूने घोषणाबाजी करण्यात आली. पदाधिकाऱ्यांकडूनही धोरण जाहीर करण्यात आलेले नसल्याने काय करायचे याबाबत सर्वसामान्य शिवसैनिक अद्यापही संभ्रमात आहे. खेड-मंडणगड-दापोली मतदारसंघात योगेश कदम यांना पाठिंबा दर्शविला असला तरीही शिवसेनेच्या कोणत्याच पदाधिकाऱ्याने राजीनामा दिलेला नाही. बंडानंतर जिल्ह्यातील शिवसैनिकांत पूर्णतः शांतता आहे. विरोधकांकडूनच नव्हे तर स्वकियांनीही शांत राहणे पसंत केले आहे.
बंडखोर आमदार यशस्वी झाले, तर जिल्ह्याच्या राजकारणात मोठा बदल होऊ शकतो. सध्या पाचपैकी तीन आमदार शिवसेनेचे आहेत. त्यातील योगेश रामदास कदम यांचे वर्चस्व असलेल्या तिन्ही तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवर या घटनांचा परिणाम होईल. उदय सामंत यांचे रत्नागिरीसह लांजा-राजापूर-संगमेश्वर या मतदारसंघात वर्चस्व आहे. सामंत यांच्या जाण्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेला धक्का बसू शकतो.
योगेश शिंदे समर्थकांची दापोलीत घोषणाबाजी.
शिवसैनिकांचा सावध पवित्रा.
पदाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मिळण्याच्या प्रतीक्षेत कार्यकर्ते.
स्थानिक संस्थांमध्ये शिवसेनेच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो.