Kolhapur Political: कोल्हापूर उत्तर निवडणूक; शिवसेना वाढवणार सतेज पाटलांचं टेन्शन? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajesh Kshirsagar,satej patil

कोल्हापूर उत्तर निवडणूक : शिवसेना वाढवणार सतेज पाटलांचं टेन्शन?

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा (Kolhapur North) मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) हे आग्रही असल्याने येथे महाविकास आघाडीत पेच होण्याची शक्यता आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे काय निर्णय घेणार यावर आता पुढील समीकरणे अवलंबून असणार आहेत.

त्यात उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतिदिनी शिवसैनिकांना संबोधित करताना सर्व निवडणुका लढविण्याचा संदेश दिला होता. त्यामुळे शिवसैनिकांनाही या जागेसाठी उत्साह आला आहे. मात्र काॅंग्रेसच्या नेत्यांनी शिवसेनेचा उमेदवार येऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

ठाकरे यांच्या या नव्या भूमिकेमुळे उत्तरमधून लढण्याच्या माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मागणीला पाठबळ मिळाल्याची चर्चा आहे. २००४ चा अपवाद वगळता १९९० पासून ते २०१९ पर्यंत कोल्हापूर उत्तर हा शिवसेनचा बालेकिल्ला राहीला आहे. शिवसनेने १९९० मध्ये हा मतदारसंघ ताब्यात घेतला, त्यावेळी कै. दिलीप देसाई शिवसेनेचे या मतदार संघाचे पहिले आमदार ठरले. त्यानंतर ९५ व ९९ च्या निवडणुकीत हा बालेकिल्ला माजी आमदार सुरेश साळोखे यांनी शाबूत ठेवला. २००४ मध्ये माजी आमदार मालोजीराजे यांनी शिवसेनेच्या ताब्यातून हा मतदारसंघ काँग्रेसला मिळवून दिला, पण त्यानंतर २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत श्री. क्षीरसागर यांनी त्यांचा पराभव केला. २०१४ लाही श्री. क्षीरसागर हेच आमदार राहीले. २०१९ मध्ये मात्र काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.

हेही वाचा: अखेर महिंद्रांनी दिले दत्तात्रयला गिफ्ट; Bolero पाहताच अश्रू अनावर

तर तिरंगी लढत

भाजपकडून ही निवडणूक लढण्याची तयारी सुरू आहे. राज्यात आतापर्यंत झालेल्या दोन्हीही पोटनिवडणुकांत भाजपने उमेदवार उभे केले आहेत, यापैकी पंढरपुरची जागा भाजपने तर देगलूरची जागा काॅंग्रेसने जिंकली. त्या धर्तीवर ही जागाही लढवण्याचे भाजपच्या पातळीवर निश्‍चित आहे. भाजप रिंगणात उतरले आणि शिवसेनेने मैत्रीपूर्ण लढत म्हणून शड्डू ठोकला तर ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे.

Web Title: Rajesh Kshirsagar North Assembly Seat Against Congres Satej Patil Kolhapur Political

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top