राष्ट्रवादी हीच दुखरी नस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात सातारा जिल्‍ह्यातून पाटणचे आमदार व गृहराज्‍यमंत्री शंभूराज देसाई आणि कोरेगावचे आमदार महेश शिंदे सहभागी झाले आहेत.

राष्ट्रवादी हीच दुखरी नस

सातारा : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात सातारा जिल्‍ह्यातून पाटणचे आमदार व गृहराज्‍यमंत्री शंभूराज देसाई आणि कोरेगावचे आमदार महेश शिंदे सहभागी झाले आहेत. दोघांच्‍याही निर्णयामागे ‘राष्ट्रवादी काँग्रेसकडून होणारी अडचण’ याच कारणाचा समान धागा आहे.

वास्‍तविक, शिवसेनेवर अवलंबून राहावं, अशी या दोन्‍हीही नेत्‍यांची परिस्‍थिती नाही. दोघेही शिवसेनेच्‍या तिकिटावर लढले असले, तरी आपापल्‍या मतदारसंघात स्‍वतःच्‍या ताकदीवर निवडून आलेले आहेत. महेश शिंदे हे तर मूळचे भाजप विचारांचेच आहेत. शिवसेना-भाजप युतीच्‍या जागावाटपात कोरेगाव मतदारसंघ शिवसेनेकडे होता. म्‍हणून भाजपने शिंदे यांना शिवसेनेच्‍या तिकिटावर लढविले होते. त्‍यामुळे आगामी काळात त्‍यांनी भाजपमध्ये उडी घेतली तरी आश्‍चर्य वाटण्याचं कारण नाही. शंभूराज देसाई यांनी याआधीच्‍या निवडणुका शिवसेनेच्‍या चिन्‍हावरच लढल्‍या होत्‍या. पाटण तालुक्‍यात त्‍यांची स्‍वतःचीच एवढी ताकद आहे, की पक्षामुळे ते विजयी होतात असे नव्‍हे, तर त्‍यांच्यामुळे शिवसेनेला एक आमदार मिळतो, अशी स्‍थिती आहे.

अशाप्रकारे दोघेही मातब्‍बर असल्‍यामुळे त्‍यांच्या बंडामुळे दोन्‍हीही मतदारसंघांत अपवाद वगळता तीव्र प्रतिक्रिया उमटलेली नाही. कोरेगाव मतदार संघात आधीपासूनच शिवसेनेची ताकद नगण्य आहे. शिंदे यांचे बहुतांश कार्यकर्ते हे काँग्रेस आणि राष्ट्रीवादीतून आलेले आहेत. त्‍यामुळे तेथे बंडखोरीच्‍या विरोधात प्रतिक्रिया येण्याचा प्रश्‍नच नाही. देसाईंची स्‍थितीही फारशी वेगळी नाही. मात्र, पाटण मतदारसंघातील जनतेचा मुंबईशी असलेला ‘कनेक्‍ट’ लक्षात घेता तिथल्‍या मूळ शिवसैनिकांमधून देसाईंच्‍या निर्णयावर नाराजी दिसून येते. याचा फटका त्‍यांना स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणुकीतही बसू शकतो. बंड यशस्‍वी झाल्‍यास त्‍याचे स्‍थानिक राजकारणावर परिणाम होण्याची शक्‍यता दिसून येत नाही. अयशस्‍वी झाल्‍यास मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघाचं ‘नॅरेटिव्ह’ बदलू शकतं. पाटणमधील जनतेच्‍या मुंबई कनेक्शनमुळे देसाईंचा विजय आजच्‍या इतका सहजसोपा राहणार नाही, तर कोरेगाव मतदारसंघात राष्ट्रवादी शशिकांत शिंदेंसाठी ताकद लावण्यात किती यशस्‍वी होणार, यावर महेश शिंदे यांचे भवितव्‍य अवलंबून राहणार आहे. तात्‍पर्य, देसाई आणि शिंदे यांची राष्ट्रवादी हीच दुखरी नस आहे.

सद्यःस्थिती

  • बंडामुळे सातारा जिल्ह्यात तीव्र प्रतिक्रिया नाही

  • पाटणमध्ये उद्धव ठाकरे यांच्या विषयी सहानुभूती असलेला मोठा वर्ग - आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का शक्य

Web Title: Rajesh Solaskar Uddhav Thackeray Satara Shivsena Rebel Eknath Shinde Satara Ncp Politics Shambhuraj Desai Mahesh Shinde

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..