esakal | मी पण करेक्ट कार्यक्रम करणार, राजू शेट्टींचा राष्ट्रवादीला इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Raju Shetty

मी पण करेक्ट कार्यक्रम करणार, राजू शेट्टींचा राष्ट्रवादीला इशारा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju shetti) यांनी सरकारविरोधात मोर्चे काढले. तसेच या काळात अनेकवेळा राज्य सरकारवर टीका केली. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवरही टीका केली. त्यानंतर आता राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या (legislative council mla list) यादीतून शेट्टी यांचे नाव वगळल्याची चर्चा आहे. त्याबाबतच आता राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा: राजू शेट्टींचे नाव वगळले? अजित पवार यांनी दिलं स्पष्ट उत्तर

राजू शेट्टी यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा आहे. त्याबाबत ते म्हणाले, ''विधानपरिषदेची एक जागा स्वाभिमानीला देणं ही दयमाया नाही. तसा समझौता दोन्ही पक्षामध्ये झाला होता. आता तो पाळायचा की, पुन्हा पाठीत खंजीर खुपासायचा हे राष्ट्रवादीने ठरवावे. करेक्ट कार्यक्रमाच्या पलीकडे आणखी एक करेक्ट कार्यक्रम असतो. तो कार्यक्रम मी करेन, असा थेट इशारा राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीला दिला. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

राज्यपाल नियुक्त आमदार निवडीतून तांत्रिक कारणामुळे शेट्टी यांना वगळण्यात आल्याच्या वृत्ताने स्वाभिमानी शेतकरी संघटनेत अस्वस्थता पसरली आहे. थेट राज्य शासनाविरोधात त्यांनी दंड थोपटल्याने महाविकास आघाडीमध्ये नाराजीचा सूर असताना, राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या यादीतून डच्चू मिळाल्याने महाविकास आघाडी आणि शेट्टी यांच्यातील संबंध ताणल्याचे दिसत आहे. पूरग्रस्तांना न्याय देण्याच्या मागणीसाठी शेट्टी यांचे सध्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा चौथा दिवस असून सरकारने अद्यापही दखल घेतलेली नाही. त्यामुळे मी एकदा निर्णय घेतला की मागे हटत नाही. जलसमाधी आंदोलन होणारच आणि या आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केलं तर महागात पडेल, असेही राजू शेट्टी म्हणाले.

२०१७ ला महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली होती. यात महाविकास आघाडीतून राज्यपाल नियुक्त आमदारकीची एक जागा देण्याचा शब्द देण्यात आला होता. गतवर्षी राज्यपाल नियुक्त आमदारांचा कार्यकाल संपला. मात्र, केंद्रात एक आणि राज्यात दुसरे सरकार यामुळे नव्याने निवडीला विलंब झाला असावा. मंत्री जयंत पाटील स्वतः शरद पवार यांचा निरोप घेऊन घरी आले होते. राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी मी स्वतः इच्छुक असावे असाही आग्रह धरला. यानंतर बारामतीला येण्याबाबत निमंत्रण दिले, असेही शेट्टी यांनी यापूर्वीच सांगितले आहे.

loading image
go to top