राज्यसभा निवडणुकीची लढत अटळ, मोर्चेबांधणी सुरू

सहाव्या जागेसाठी चुरस; ‘मविआ’ आमदारांना हलविणार
Rajya Sabha elections mahavikas aghadi sixth place seat shiv sena bjp  chances of unopposed election dropped mumbai
Rajya Sabha elections mahavikas aghadi sixth place seat shiv sena bjp chances of unopposed election dropped mumbaisakal

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर उमेदवार देऊन तो निवडून आणण्यावर शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आज अखेर ठाम राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार रिंगणात कायम ठेवले आहेत. ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या उद्देशाने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज भाजप नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या; तरीही भाजपने आपली भूमिका कायम ठेवली. परिणामी, राज्यसभेसाठी निवडणूक अटळ आहे. दुसरीकडे या निवडणुकीमुळे आमदारांच्या घोडेबाजाराला ऊत येवू शकतो ही बाब लक्षात घेऊन शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसच्या आमदारांना ८ ते १० जून रोजी मुंबईत एकत्र ठेवले जाणार आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेवर आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना आणि भाजपने प्रतिष्ठा पणाला लावली आहे. या जागेवर शिवसेनेने संजय पवार यांना रिंगणात उतरविल्यानंतर भाजपनेही कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शुक्रवार दुपारी तीन वाजेपर्यंत शेवटची मुदत होती. मात्र, या दोन्ही पक्षांचे नेते आपापल्या भूमिकांवर कायम राहिले त्यामुळे पवार, महाडिक यांनी अर्ज मागे घेतले नाहीत.

फडणवीस यांचा नकार

शिवसेनेचे खासदार अनिल देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, क्रीडामंत्री सुनील केदार यांनी सकाळीच विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. विधान परिषदेच्या निवडणुकीत मदत करण्याचा शब्द देत, राज्यसभेच्या निवडणुकीतून आपला उमेदवार मागे घेण्याची विनवणी या तिघा नेत्यांनी फडणवीस यांना केली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते. मात्र, फडणवीस यांनी माघार घेण्यास नकार दिला.

शिवसेनेचा बाणा कायम

फडणवीसांच्या भूमिकेनंतर शिवसेना माघार घेणार का? याची उत्सुकता होती. परंतु, शिवसेनेने आपला बाणा कायम ठेवला आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना ‘वर्षा’ बंगल्यावर बोलावून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी चर्चा केली. त्याचवेळी भाजपला पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदारांना वगळून इतर आमदारांच्या बैठकीचे नियोजनही ठाकरे यांनी आखले आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे बैठकांचे सत्र सुरूच राहिले. त्याचवेळी फडणवीस, चंद्रकांत पाटील हेही भाजप नेत्यांच्या गाठीभेटी घेत होते

भाजपमध्येही चर्चा

शिवसेनेविरोधात लढण्याचा पवित्रा घेतल्यानंतर भाजपच्या गोटातही दिवसभर जोरदार हालचाली सुरू होत्या. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, चंद्रकांत बावनकुळे आणि इतर मंडळींच्या बैठका झाल्या. त्यानंतर प्रदेश कार्यालयात येऊन पाटील यांनी पुन्हा प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. त्यामुळे भाजप नेत्यांनी येत्या दहा जूनपर्यंत ''मिशन राज्यसभा’ टार्गेट ठेवल्याचे स्पष्ट आहे.

आमच्याकडे पुरेसे संख्याबळ

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाटील म्हणाले, ‘‘ निवडणुकीतून माघार घेण्याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चर्चा केली. मात्र, ही जागा आम्ही शंभर टक्के जिंकणार आहोत. आमच्याकडे आणि त्यांच्याकडेही पुरेसे संख्याबळ नाही. भाजपला १२ मते कमी असून, ती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यात इतर पक्षाच्या आमदारांशी बोलणी सुरू आहे. आच्या पक्षाच्या आमदारांवर आमचा विश्वास असून, त्यांना कुठेही बंद करणार नाही.

आमच्याकडेच मते अधिक ः भुजबळ

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले, राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून भाजप नेत्यांची भेट घेतली. परंतु ते भूमिका बदलत नसल्याने आमच्याकडील संख्याबळाचे आकडेही त्यांना दाखविले. विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला एक जागा अधिक देण्याचा प्रस्ताव फडणवीस यांच्यापुढे मांडला. मात्र त्यांना राज्यसभा लढायचीच आहे. त्यामुळे आम्हीही निर्णय कायम ठेवला आहे. प्रत्येक जागेसाठीचा मतांचा कोटा संपल्यानंतर उरलेल्या मतांची संख्या महाविकास आघाडीकडेच अधिक आहे.’’

आम्ही निवडणूक जिंकणार असल्यानेच आम्ही आमचा उमेदवार रिंगणात ठेवलेला आहे. महाविकास आघाडीचे आमदार आमच्या सोबत आहेतच, पण अपक्ष आमदारांसोबतही सरकारने चांगला संवाद ठेवलेला आहे. पण त्यांना फूस लावण्याचे आणि त्यांच्यामागे केंद्रीय तपास लावण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, त्यांना फोडण्यासाठी वेगवेगळी आमिषे दाखविली जात आहेत.

- संजय राऊत, नेते शिवसेना

आमच्याकडे सध्या ३० मते आहेत, इतरही १२ मते भाजपला मिळतील त्यामुळे भाजपच ही जागा जिंकेल. आम्हीच महाविकास आघाडीला प्रस्ताव दिला होता की, शिवसेनेने त्यांचा दुसरा उमेदवार मागे घ्यावा, त्या बदल्यात आम्ही विधानपरिषदेची पाचवी जागा लढविणार नाही. पण आज साडेअकरा वाजून गेल्यानंतरही त्यांनी चर्चा केली नाही त्यामुळे निवडणूक अटळ आहे.

- चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष भाजप

महाविकास आघाडी राज्यसभेची सहावी जागा लढविणार असून ती आम्ही जिंकून दाखवू. काही अपक्ष आणि छोटे पक्ष आमच्यासोबत देखील आहेत हे विसरून चालणार नाही. महाविकास आघाडीकडे उमेदवार निवडून आणण्याएवढी पुरेशी मते आहेत. या सगळ्या प्रक्रियेमध्ये ‘मविआ’त योग्यपद्धतीने संवाद सुरू आहे.

- बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री, काँग्रेस नेते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com