
एकवीसावे शतक जगाला विनाशाच्या उंबरठ्यावर घेऊन गेले आहे. युद्ध आणि संहार यांचे पृथ्वीवर पीक वाढत आहे. मरणासन्न अवस्थेत मानवाचे विश्व जाऊन पोहोचले आहे. मरणाच्या, भयाच्या या भीषण काळोखात मानवतेचा प्रखर दीपस्तंभ म्हणून सूर्यकुळातील ज्ञानतेजाचे आवाहन करण्याची विश्वमानवतेची हीच खरी गरज आहे. विसाव्या आणि एकवीसाव्या शतकाचा सुवर्णमध्य ज्या ज्ञानसूर्याच्या तेजाने प्रखर होऊन भारतभूमीच्या मृतवत लोकांमध्ये चैत्यन्य व शक्तीचे, भक्तीच्या स्वरूपातून संजीवन पेरत आले ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणजे मानवतेचे थोर उपासक आणि अध्यात्मक्षेत्रातील विज्ञानवादी क्रांतिकारी संत होत. मानवतेचा संबंध हा मानवाच्या जगण्याचा मूलाधार आहे. हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जनतेला ठणकावून सांगायचे. आपला परिचय करून देतानाही राष्ट्रसंतांनी मानवताही है पंथ मेरा, इन्सानियत है धर्म मेरा, असाच करून दिला आहे.
आज समाज भयग्रस्त आहे. धर्माचे शुद्ध स्वरूप नष्ट झाले आहे. वर्ण आणि जातींच्या दुरभिमानाने माणसांच्या बुद्धीला ईर्षा, द्वेष व हिंसेचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे मानवी समाज साशंक व संस्कारहीन होऊन तो तेजहीन झाला आहे. अशा तेजहीन मानव समाजाला राष्ट्रसंतांनी त्यांच्या साहित्यातून भजनादी कवनातून आत्मजागृतीकडे वळवण्याचा कसोसीने प्रयत्न केला आहे.
‘इन्सानही है देवता जो सत्य के पथपर गया’, असे ते लहरकी बरखा या ग्रंथात लिहितात. मनुष्याला दैवतांच्या उच्च अवस्थेला नेण्यासाठी मानवी मनाची शेती नांगरण्याचे काम तुकडोजी महाराजांनी केले आहे. नुसता जनसुधारणेचा संदेश देऊन राष्ट्रसंत थांबले नाहीत, तर त्यांनी अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ या आध्यात्मिक अधिष्ठान असलेल्या आणि समाजजागृतीचे भान असलेल्या संतचारित्र्यशील राष्ट्रभक्त व मानवतेच्या सेवकांची रचनाबद्ध संघटना स्थापना केली. ‘आधी केले मग सांगितले’, या न्यायाने त्यांची ग्रामगीता मानवी सुधार व मानवतेच्या मूल्यांवर आधारित आहे.
जगाचा केंद्रबिंदू हा मानव आहे. म्हणून प्रथम पाया मानव वर्तन आहे. त्याचे उत्तम संस्काराने जतन झाल्यास एक अहिंसक व मानवताप्रिय सदाचारी बुद्धिवंत माणूस किंवा सुजाण नागरिक घडवता येतो, यावरच राष्ट्रसंतांचे समग्र तत्त्वज्ञान आधारभूत आहे. आज देशाला सुजाण व विश्वमानवतेची समज असलेल्या मानवाची गरज आहे. असा न्यायक्षम सज्जन मानवांचा वर्ग म्हणजेच स्वर्ग आहे, यावर राष्ट्रसंतांचा प्रगाढ विश्वास आहे. हे सार्थ ठरवण्यासाठी त्यांनी सामुदायिक ध्यान व प्रार्थना या अत्यंत सोप्या आणि वैश्विक उपासना मार्गाची निर्मिती केली आहे. है प्रार्थना गुरुदेवसे यह स्वर्गासम संसार हो, अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो, ही आर्जव त्यांनी जगदीश्वराला केवळ मानवतेच्या प्रेमातूनच केलेली आहे.
मनाची शेती नांगरून मानवतेचे पीक फुलवण्याचे अवघड कार्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केले आहे. ते म्हणतात की या देशोदेशीच्या सीमा केवळ व्यवस्थेसाठी प्रत्येक देशाने केल्या आहेत. परंतु, ईश्वरी साम्राज्यात विश्व हेच देश आहे. त्यादृष्टीने जगातील मानवांना मानवतेची, आपुलकीची, प्रेम व परस्पर सहकार्याची गरज आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी मानवताप्रिय व सतधर्मप्रिय समाजाचे नवनिर्माण करण्याचे महादुष्कर कार्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या हयातीत आरंभ केले आहे आणि आज हजारो प्रचारकांच्या माध्यमातून तो मानवतेचा प्रचारमार्ग प्रशस्त झाला आहे.
वंचित दीन, दु:खी, कष्टी जीवांना होणारा असह्य त्रास राष्ट्रसंतांनी कधीही स्वीकारला नाही. देशाचे हे दु:ख जणू त्यांच्या देहाला झालेली वेदना आहे, असे माणूनच त्यांनी दीन, असाहाय्य जनतेच्या सेवेला प्रथम प्राधान्य दिले. दीन, दुखी, कष्टी, पीडित व गरीब जीवांची सेवा हेच मानवतेच महापुन्य असल्याचे ते मानत, म्हणूनच जनसेवेतच ईश्वरसेवा आहे आणि ही मानवतेची उपासना व राष्ट्रसेवा आहे, अशी शिकवण राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी जनतेला दिली आहे.
मानवातील वाईट विचार आणि विषप्रवृत्तीला नष्ट करण्यासाठी सत्यधर्माचा व सेवेच्या आध्यात्मिक तत्त्वांचा संस्कार मानवजीवनावर रुजवणे आवश्यक आहे. आज या विज्ञानयुगात तंत्रक्रांतीच्या प्रवाहात मनाची मशागत करून आत्मक्रांतीने मानवतेचे पीक जगवायचे असेल तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या तत्त्वज्ञानातील मानवतेच्या बियाण्यांची जगात पेरणी करण्याची नितांत गरज आहे. ही गरज लक्षात घेता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या महामानवाच्या विचारांचा जागर देशाच्या सरकारनेच करण्याची आवश्यकता आहे.
अखिल मानवतेचा व्यापक दृष्टिकोन जेव्हा कधी विभिन्न संशोधनातून जगाच्या पाठीवर पुढे येईल, तेव्हा जगाच्या भविष्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे तत्त्वज्ञान मानवतेच्या परीपोशात अव्वल स्थानी असेल, यात तीळमात्रही संशय नाही. शांतीचे नुसते प्रदर्शन केल्यापेक्षा राष्ट्राराष्ट्रांचे सहअस्तित्व टिकवायचे असेल तर सामंजस्याने शांतीचे तत्त्व सर्वच राष्ट्रांनी कसोशीने पाळले पाहिजेत, असे निर्भीड बोल १९५५ ला जपानच्या टोकियो शहरात भरलेल्या विश्वशांती व जागतिक धर्मपरिषदेत भारताचे प्रतिनिधी म्हणून उद्युक्त केले होते.
विश्वशांतीचा आलेख त्यांच्या भजन, भाषण व लेखनात पानोपानी स्पष्ट होतो. आज गाव या विश्वघटकाकडे देशाचे लक्ष वेधण्याची आवश्यकता आहे. कारण, मानवतेचे महनीय कार्य ग्रामामधून साध्य होऊ शकते. यासाठीच राष्ट्रसंतांची ग्रामगीता जगातल्या प्रत्येक माणसाला प्रेरित करण्याचे सामर्थ्य सिद्ध करते. ग्राम नाही तर प्रलय होईल म्हणून ग्रामजीवनाला मानवतेच्या व राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य राष्ट्रसंतांनी अव्याहत केलेले आहे आणि आज त्यांचे साहित्य राष्ट्राला प्रेरित करीत आहे.
राष्ट्राच्या सेवेसाठी अखंड झटणारे तुकडोजी महाराज हे खरेखुरे राष्ट्रसंत आहे. परबंधात अडकलेला देश स्वतंत्र करण्यासाठी आपली साधुत्वाची चाकोरी बाजूला सारून देशाचा संसार करायचे सामर्थ्य या परमार्थी अवलियाकडे होते. म्हणूनच देशाचे प्रथम राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत या उपाधीने अलंकृत केले आहे. केवळ आणि केवळ मानवता हीच राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांची ओळख आहे. म्हणूनच त्यांचा महानिर्वाण क्षण व तो प्रयाणदिन सर्वसंत स्मृती मानवतादिन म्हणून पाळला हे वर्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ५३ वे पुण्यतिथी वर्ष आहे. या कोरोनाच्या जागतिक संकट काळात आपली मानवतेची बांधीलकी कायम ठेवत अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाद्वारे रक्तदानाचे आवाहन केले आहे.
मंडळाच्या देशभर असलेल्या २० हजार शाखा या रक्तदान चळवळीत कार्यान्वित होत आहे. वंदनीय राष्ट्रसंतांना ही मानवताप्रेमी जनतेची स्मृती श्रद्धांजली ठरणार आहे. त्यामुळे गुरुदेवप्रेमींनी या रक्तदान चळवळीत सहभागी होऊन रक्तदान करावे. राष्ट्रसंताच्या मानवतेच्या महनीय कार्याचा हाच खरा सन्मान असेल व हीच त्यांना आपण सर्व मानवता प्रेमीजनांनी वाहिलेली श्रद्धांजली असेल. अशा या मानवतेच्या थोर उपासक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना विनम्र प्रणाम.
- अॅड. दिलीप कोहळे, कार्यकारिणी सदस्य, अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रम
मो. ९४२०७१९३९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.