शाळा बंद, विद्यार्थी घरी अन् शिक्षक नेत्यांच्या दारी...

युवराज पाटील
Sunday, 19 July 2020

२७ फेब्रुवारी २o१७ च्या ग्रामविकास विभागाच्या निर्णयाने शिक्षक बदल्यांची पारंपारिक पद्धत मोडीत काढुन ऑनलाइन बदल्यांचे नवे धोरण आणले.

शिरोली पुलाची (कोल्हापूर) - राज्याच्या ग्रामविकास विभागाने नुकताच जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या जिल्हास्तरावर ऑफलाइन म्हणजे पारंपारिक पद्धतीने अर्ज मागवून करण्याचा निर्णय जाहीर केला असून या निर्णयावर शैक्षणिक क्षेत्रातून उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद, विद्यार्थी घरी व शिक्षक नेते व मंत्र्यांच्या दारी असे चित्र पहायला मिळत आहे.

२७ फेब्रुवारी २o१७ च्या ग्रामविकास विभागाच्या निर्णयाने शिक्षक बदल्यांची पारंपारिक पद्धत मोडीत काढुन ऑनलाइन बदल्यांचे नवे धोरण आणले. राज्यस्तरावरून एनआयसी पुणेच्या माध्यमातून संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षकांच्या बदल्या दोन वर्षे केल्या. शिक्षकांची वेगवेगळ्या संवर्गात विभागणी होऊन सेवाज्येष्ठता हा निकष लावत शाळा मागण्याची सोय या प्रणालीत होती. सुमारे ७० ते ८० टक्के शिक्षकांची या बदल्यातून चांगली सोय झाली. तथापि उर्वरीत शिक्षकांची होणारी गैरसोय टाळून नवी निर्दोष पद्धती तयार करण्यासाठी सरकारने पाच मुख्य कार्यकारी अधिकारी यांची समिती नेमली. या समितीने राज्यातील सर्व शिक्षक संघटनाना आमंत्रित करून सूचना मागविल्या चर्चा केल्या व बदली साठी नवी सुधारित पद्धती देण्याचे जाहीर केले.

वाचा - उद्धव ठाकरेंनी विजयदुर्ग किल्ल्याच्या पडझडीचा फोटो पाहिला इन्स्टाग्रामवर अन्...

दरम्यानच्या काळात या वर्षी कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वच बदल्या रद्द करण्याचा आदेश सरकारने काढला व बदलीची चर्चा काहीशी थंडावली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असून, त्या कधी सुरू होतील हे सांगता येत नाहीत. राज्यात हजारो शिक्षक कोरोना योद्धे म्हणून काम करत असताना काही शिक्षक नेते मात्र सातत्याने शिष्टमंडळासह मंत्री महोदयांच्या भेटी घेवून बदल्या करणे कसे आवश्यक आहे हे पटवून देण्याच्या कामात व्यस्त होते.
यामुळे सरकारने ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन बदली करण्याचा निर्णय घेतला. २७ फेब्रुवारी २o१७ च्या धोरणानुसार म्हणजे शिक्षक संघटनाच्या सोबत झालेली चर्चा, सुचविलेल्या दुरुस्त्या विचारात न घेता शिक्षकांची बदली करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जुनेच धोरण त्रुटी दूर न करता राबविण्यापेक्षा शिक्षक बदलीसांदर्भातील निर्णयातील त्रुटी दूर करून कोरोना संकट दूर झाल्या नंतर बदल्या कराव्यात अशी मागणी  बहुसंख्य शिक्षक संघटना करत आहेत. जुनेच धोरण राबविल्यास बदल्यांमध्ये अनियमितता येणार आहे. त्यामुळे या निर्णयावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ऑफलाईन बदल्या बहुसंख्य शिक्षक व संघटना यांना नको असताना हा निर्णय का घेतला असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातून उपस्थित होत आहे. नवीन संगणकीय प्रणाली विकसित करून जिल्हास्तरावरून ऑनलाईन पद्धतीनेच बदल्या केल्या जावेत अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे.

 

बदली धोरणांत बदल करून बदल्या करावयाच्या झाल्यास सॉफ्टवेअर तयार करण्यास 2 महिने लागणार असतील तर  बदल्या अभ्यासगट अहवालाप्रमाणे व्हायला  हव्या होत्या आणि 27/2 प्रमाणेच बदल्या कारायच्या होत्या तर 27/2 चे सॉफ्टवेअर तयारच होते. त्यामुळे अभ्यासगटाच्या शिफारशीनुसार बदल्या व्हाव्यात व ऑनलाइन पद्धतीने व्हाव्यात.
रविकुमार पाटील, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (थोरात गट)

शिक्षक संघटनांनी सुचविलेल्या दुरुस्त्या विचारात घेवून २७ फेब्रुवारी २o१७ च्या शासन निर्णयात बदल करत आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदल्या ऑनलाइन पद्धतीनेच व्हाव्यात. घाईघाईने बदल्या केल्यास पुन्हा गत बदलीप्रक्रियेत गोंधळ होऊन सर्वसामान्य शिक्षकांना कदापी न्याय मिळणार नाही.
अर्जुन पाटील, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा:कोल्हापूर.

संपादन - मतीन शेख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: reaction on announcing decision transfer teachers offline district level