बंडाचे बीज मीच पेरले - विजय शिवतारे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vijay Shivtare

शिवसेनेतील छुपी नाराजी, शिवसेनेतील ४० आमदारांचे बंड आणि या बंडामागील डावपेचात शिवतारे यांनी आणखी एक गुपित उघड केले.

Political News : बंडाचे बीज मीच पेरले - विजय शिवतारे

मुंबई - विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीआधीच महाविकास आघाडीचे गणित जुळवून ठेवले होते. त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाडापाडीची रणनीती आखली होती, असा खळबळजनक आरोप बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते विजय शिवतारे यांनी आज केला. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या सरकारबद्दल नाराजी दाखवून बंडाचे बीज मीच पेरले होते, असा गौप्यस्फोटही शिवतारे यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महाविकास आघाडीचे समीकरण, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता, त्यावरून शिवसेनेतील छुपी नाराजी, शिवसेनेतील ४० आमदारांचे बंड आणि या बंडामागील डावपेचात शिवतारे यांनी आणखी एक गुपित उघड केले. शिंदे यांच्यासोबतच्या चार ते साडेचार तासांच्या भेटीत हे सरकार जनतेच्या हिताचे नाही, उद्धवजींकडून चूक होत आहे. तुम्ही त्यांना निर्णय बदलायला सांगा, असा आग्रह धरल्याचे शिवतारे यांनी म्हटले आहे.

२०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर घडामोडी घडल्या. शिवसेना आणि भाजप युतीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे गेले. मात्र, निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. मात्र आघाडीचा निर्णय हा निवडणुकीनंतर नव्हे तर निवडणूक होण्याच्या आधीच झाला होता.

- विजय शिवतारे, नेते, शिंदे गट