खाऊन पाहिलात का कधी चविष्ट नागपूरी गोळाभात?

टीम ईसकाळ
Wednesday, 23 September 2020

नागपुरचे खास वैशिष्ट्य असलेला पदार्थ म्हणजे गोळाभात. जाणून घेऊया याची कृती.

नागपूर : प्रत्येक प्रांताचे आपले असे खास खाद्य वैशिष्ट्य असते. त्या त्या प्रांतातील पीकांवर तिथले खानपान अवलंबून असते. जसे दक्षिण भारतात तांदळाचे उत्पन्न अधिक आहे, त्यामुळे तिथे इडली-दोशासारखे तांदळाचे पदार्थ अधिक खाल्ले जातात. पंजाबमध्ये मके कि रोटी, सरसो का साग हे वैशिष्ट्य आहे. अलिकडे जग ग्लोबल झाले आहे. त्यामुळे जगभरातील खाद्यवैशिष्ट्य जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात उपलब्ध असतात. तरीही प्रांताचे आपले वेगळेपण उरतेच. असेच नागपुरचे खास वैशिष्ट्य असलेला पदार्थ म्हणजे गोळाभात. जाणून घेऊया याची कृती.
सर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी

साहित्य
भातासाठी
३/४ कप बासमती तांदूळ
तांदुळाच्या दुप्पट गरम पाणी
१/२ टीस्पून मीठ
१/२ टीस्पून जिरे
२ टेबलस्पून तेल
गोळ्यासाठी
१/२ कप ते ३/४ कप बेसन
१/२ टीस्पून ओवा
१ टीस्पून धणेपूड
१ टीस्पून जिरेपूड
१/२ टीस्पून हळद
१/२ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून साखर
मीठ चवीप्रमाणे
२ टीस्पून कडकडीत गरम तेलाचे मोहन
पीठ कालवण्यासाठी थोडेसे पाणी
फोडणीसाठी
१/४ ते १/२ कप तेल
३-४ सुक्या मिरच्या
१/४ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून हिंग

सविस्तर वाचा -  एक अधिक संधी देणारा अधिक मास

कृती
 *एका बाऊलमध्ये बेसन घ्या. त्यात मीठ,साखर,ओवा, धने-जिरेपूड ,हळद आणि तिखट घालून एकत्र करा. कडकडीत तेलाचे मोहन घालून मिक्स करा. किंचित पाणी घालून कालवून घ्या.मिश्रण चिकट होईल इतकेच पाणी घाला. मिश्रण पातळ करू नका.
 *१० मिनिटे आधीच तांदूळ धुवून ठेवा. पातेल्यात तेल गरम करा आणि जिरे फोडणीला घाला. जि-याचा खमंग वास आला की, धुतलेले तांदूळ घालून परता. ३-४ मिनिटे तांदूळ सुटसुटीत होईपर्यंत परतून घ्या. तांदुळाच्या दुप्पट (इथे १ १/२ कप) गरम पाणी घाला. मीठ घालून झाकण ठेवून भात शिजत ठेवा. भात शिजत आला की बेसनाच्या मिश्रणाचे गोळे करून मध्ये मध्ये घाला. झाकण ठेवून मध्यम आचेवर भात पूर्ण शिजवून घ्या. भाताबरोबर गोळे सुद्धा शिजतील.
* दुसरीकडे छोट्या कढईत तेल गरम करा. तेल चांगले तापले की, मोहरी घाला. मोहरी तडतडली की, सुक्या मिरच्यांचे २ तुकडे घाला. फोडणी पूर्ण गार होऊ द्या.
* १५-२० मिनिटांनी फोडणी गार झाली की जेवताना भातावर प्रत्येकी १ ते २ टेबलस्पून तेल घ्या. फोडणीतली मिरची आणि गोळा भातामध्ये कुस्करून गोळा भाताचा आस्वाद घ्या. खाताना वजनाचा विचार मात्र करू नका कारण. गोळा भातावर घ्यायच्या फोडणीमुळेच जास्ती मजा येते.
सोबत टोमॅटोचे सार किंवा चिंचेचे सार द्या. गोळाभाताबरोबर ताकही छान लागते.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Receipe of Nagpuri Gola-Bhat