esakal | विद्यार्थ्यांनो खुषखबर! जिल्हा परिषदांमधील आरोग्य विभागात नोकरभरती 
sakal

बोलून बातमी शोधा

mantralay.jpg

प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या पत्रानुसार... 

  • राज्यात कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढत असून पावसाळ्यात साथरोगांचाही प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता 
  • जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य केंद्रे व उपकेंद्रातील पदांची तत्काळ भरती करा 
  • जिल्हा परिषदांच्या अखत्यारित असणारी आरोग्य सेवेतील गट क व गट ड संवर्गाची रिक्‍त पदे भरावीत 
  • ग्रामीण जनतेला तातडीने आरोग्य सेवा देण्याची अत्यंत आवश्‍यकता आहे 

विद्यार्थ्यांनो खुषखबर! जिल्हा परिषदांमधील आरोग्य विभागात नोकरभरती 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : जिल्हा परिषदांमधील गट क व ड संवर्गातील सुमारे 47 हजार पदे तर सार्वजनिक आरोग्य विभागात 20 हजारांहून अधिक पदे रिक्‍त झाली आहेत. आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असून पावसाळ्यात साथरोगांचाही प्रादुर्भाव वाढेल. या पार्श्‍वभूमीवर ग्राम विकास विभागाने जिल्हा परिषदाअंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमधील गट क व ड संवर्गातील पदांची तत्काळ भरती करावी. जेणेकरुन ग्रामीण जनतेला तातडीने आरोग्य सेवा मिळेल, असे पत्र राज्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी ग्राम विकास विभागासह सार्वजनिक आरोग्य विभागाला पाठविले आहे. 

राज्यातील गृह, सार्वजनिक आरोग्य विभाग, सामाजिक न्याय, जलसंपदा, उद्योग व कामगार, कृषी व पशुसंवर्धन, अन्न व नागरी पुरवठा, महिला व बालकल्याण या विभागांसह सरळसेवेतून भरावयाची तब्बल दोन लाखांहून अधिक पदे रिक्‍त आहेत. तत्पूर्वी, राज्यात एक लाखांहून अधिक पदांची मेगाभरतीचे नियोजन राज्य सरकारने केले होते. मात्र, कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा परिणाम झाल्याने मेगाभरतीचे नियोजन तुर्तास लांबणीवर पडले आहे. दरम्यान, राज्याचे प्रधान सचिव डॉ. व्यास यांनी पद भरतीचे पत्र ग्राम विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव, आरोग्य विभागाचे आयुक्‍त, संचालक व सार्वजनिक आरोग्य विभागाचे मंत्री व राज्यमंत्र्यांच्या खासगी सचिवांनाही पाठविले आहे. त्यामुळे पावसाळ्यात ग्रामीण जनेतेला तातडीने आरोग्य सेवा मिळावी, या हेतूने ग्राम विकास विभागाने आता जिल्हा परिषदांकडील आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमधील रिक्‍त पदांच्या भरतीचे नियोजन सुरु केले आहे. 