

तात्या लांडगे
सोलापूर : जिल्हा परिषदा, महापालिका व नगरपालिका शाळांमध्ये नऊ हजार शिक्षकांची भरती होणार आहे. त्यात २०२४-२५ आणि मे २०२६ पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या रिक्त जागांचा देखील समावेश असणार आहे. पवित्र पोर्टलद्वारेच ही भरती होणार असून मार्चपासून भरती प्रक्रिया सुरु होईल, असे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यातील अनेक जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये पटसंख्येच्या प्रमाणात शिक्षक कमी आहेत. अनेकदा शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांना आंदोलने करावी लागल्याचे अनेकदा पहायला मिळाले. यावर हिवाळी अधिवेशनात आमदारांनी प्रश्न उपस्थित करीत शिक्षक भरतीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आता पहिल्यांदाच मे २०२६ पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची पदे देखील भरली जाणार आहेत. दरवर्षी जिल्हा परिषदांसह महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमधील पाच हजार ७०० पदे रिक्त होतात.
दरम्यान, १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शाळांची २०२५-२६ च्या शैक्षणिक वर्षातील संचमान्यता पूर्ण झाली आहे. संचमान्यतेच्या निकषांनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे पहिल्यांदा समायोजन होईल. त्यानंतर रिक्त राहिलेली पदे (एकूण रिक्त पदांच्या ८० टक्के) भरली जाणार आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिकांना मे २०२६ पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची पदे समाविष्ठ करून पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड कराव्या लागणार आहेत. त्यानुसार पवित्र पोर्टलवरून शिक्षक भरती होणार आहे.
राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे
एकूण मंजूर पदे
१.९० लाख
सध्या रिक्त पदे
६,०००
अतिरिक्त शिक्षक
२,४००
मे २०२६ पर्यंत निवृत्त शिक्षक
५,५००
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे पत्र
शालेय शिक्षण विभागाकडील शिक्षक भरती आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत होईल, असा शासन निर्णय झाला. मात्र, या विभागाकडील कर्मचाऱ्यांना ‘टीईटी’चाच अनुभव आहे. पहिल्यांदाच शिक्षक भरती या विभागाच्या वतीने होणार असल्याने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे मनुष्यबळ देखील कमी आहे. त्यामुळे शिक्षक भरतीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण व अतिरिक्त मनुष्यबळ पुरविण्यासंदर्भातील पत्र शासनाला पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
‘टीईटी’चा निकाल याच महिन्यात
२३ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून उत्तीर्ण उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांची पडताळणी सुरु आहे. ३१ जानेवारीपूर्वीच ‘टीईटी’चा निकाल जाहीर होईल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या परीक्षेत उत्तीर्ण उमेदवार देखील शिक्षक भरतीत सहभागी होऊ शकतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.