महाराष्ट्रात रेड अलर्ट, धरणं ओव्हरफ्लो झाल्याने धोका; जाणून घ्या नेमकी परिस्थिती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण राज्यात पाण्याचा हाहाकार सुरू आहे.

मुंबई : गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण राज्यात पाण्याचा हाहाकार सुरू आहे. कोकणासह कोल्हापूर, नाशिक, सांगली, पुणे, औरंगाबादमध्ये पावसाचं रौद्र रुप पाहायला मिळालं आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. पाण्यात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी आता एनडीआरएफची टीम अनेक गावांमध्ये दाखल झाले आहे. अशात ठाणे, रायगड, पालघरला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुण्यात गेल्या 10 दिवसाइतका पाऊस उद्या एकाच दिवशी पडणार (व्हिडिओ)

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रेदश, विदर्भ, मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर पुढच्या काही दिवस कायम असेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.(ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये मान्सून अधिक सक्रिय होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर अनेक गावांना आणि शहरांना सतर्कतेचा उशारा देण्यात आला आहे.

पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र, कोकण, कर्नाटकच्या किनारी भागात, राजस्थान, गुजरातमध्ये मुसळधार पाऊस होईल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. तर मुसळधार पावसामुळे कोकणातला पूर अद्याप कमी झालेला नाही. हायवेवर अनेक ठिकाणी झाडं पडल्यामुळे महामार्ग बंद करण्यात आले आहेत. तर रायगडमध्ये महाड शहराला महापुराचा विळखा पडला आहे. महाड-पुणे रस्त्यावरील वरंध घाटामध्ये माझेरी गावाजवळ दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प आहे.

असा असेल मुंबईत पाऊस...रायगड, पालघरला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असला तरी मुंबईत पावसाच्या हलक्या सरी बरसतील असं हवामान खात्याने म्हटलं आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोकण, गोवा, दक्षिण-मध्य महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये मुसळधार पावसाने थैमान खातलं आहे.

मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक बंदच

कोकण आणि गोव्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता...
बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे कोकण आणि गोव्यामध्ये बुधवारी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर पुढच्या काही दिवस पावसाचा जोर कायम राहील असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

या जिल्ह्यांता महापुराचा धोका वाढला...
- रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय. महाड शहरात 8 ते 9 फूट पुराचं पाणी शिरलं आहे. बिरवाडी आसनपोई गावातील 200 पेक्षा अधिक लोकांना NDRF टीमने सुरक्षित स्थळी हलवलं आहे. ढगफुटी सारखी परिस्थिती झाली आहे.

- रायगडमध्ये महाड शहर, आसनपोई , बिरवाडी भागातील 250 नागरिकांची पुराच्या पाण्यातून सुटका करण्यात आली असून महाड, पोलादपूर, माणगाव, तळा तालुक्यातील शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे.

- सांगली जिल्ह्यात महापुराची स्थिती गंभीर बनली आहे. सांगलीतील 100 पेक्षा जास्त गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणच्या 41 हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. तर कृष्णा नदीनेही 52 फुटांची पातळी गाठली आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे.

- कोल्हापूरमध्ये राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 54 फुट 10 इंच इतकी आहे. (धोकादायक पातळी 43 फूट) त्यामुळे एकुण 111 बंधारे पाण्याखालील गेले आहेत. तर पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग सांगली नाक्याजवळ बंद करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Red alert in maharashtra due to rain